Arshdeep Singh’s New Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारी सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांची चमक पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेकडून ९ विकेट्स घेतल्या. त्यामुळे पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.३ षटकांत अवघ्या ११६ धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज –
पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंगने १० षटकात ३७ धावा देत ५ विकेट्स घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ विकेट घेणारा अर्शदीप सिंग पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपच्या आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फिरकी गोलंदाजांनी हा पराक्रम केला असला, तरी आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला ही कामगिरी करता आली नव्हती.
एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा अर्शदीप भारताचा चौथा गोलंदाज ठरला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ५ बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा – IPL 2024 Auction : लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि जागा शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
५/६ – सुनील जोशी, नैरोबी, १९९९
५/२२ – युजवेंद्ग चहल, सेंच्युरियन, २०१८
५/३३ – रवींद्र जडेजा, कोलकाता, २०२३
५/३७ – अर्शदीप सिंग, जो’बर्ग, २०२३
भारतासमोर विजयासाठी ११७ धावांचे लक्ष्य –
पहिली वनडे जिंकण्यासाठी भारतासमोर विजयासाठी ११७ धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात अर्शदीपशिवाय आवेश खाननेही शानदार गोलंदाजी केली. आवेशने ८ षटकात २७ धावा देत 4 बळी घेतले. कुलदीप यादवलाही यश मिळाले.