Arshdeep Singh Took Most T20I Wickets in IND vs SA 3rd T20I: अर्शदीप सिंगने आपल्या वेगाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या धावांवर अंकुश ठेवत अखेरच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. सुरुवातीला भारताने तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २१९ धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला ७ बाद २०८ धावांपर्यंत रोखले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट घेतले. वरूण चक्रवर्तीने २ तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट फलंदाजी करत सामना अखेरचा षटकापर्यंत नेला. पण अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत २५ धावांचा बचाव केला आणि भारतीय संघाने विजय नोंदवला. अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात विकेट घेत इतिहास घडवला आहे. अर्शदीपने ४ षटकांत ३७ धावा देत ३ विकेट घेत सर्व भारतीय वेगवान गोलंदाजांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
एक वेगवान गोलंदाज म्हणून, अर्शदीप सिंगने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारख्या दिग्गजांना पराभूत करून भारतासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन एक मोठी कामगिरी केली आहे. अर्शदीपच्या नावावर आता टी-२० क्रिकेटमध्ये ९२ विकेट्स आहेत. या सामन्यापूर्वी अर्शदीप भुवीला मागे टाकण्यापासून २ विकेट दूर होता तर जसप्रीत बुमराहच्या ८९ विकेट्सच्या बरोबरीत होता. पण आता अर्शदीप हा टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
९६ – युझवेंद्र चहल (७९ डाव)
९२* – अर्शदीप सिंग (५९ डाव)
९० – भुवनेश्वर कुमार (८६ डाव)
८९ – जसप्रीत बुमराह (६९ डाव)
८८ – हार्दिक पंड्या (९४ डाव)
आता अर्शदीपचे लक्ष्य युझवेंद्र चहलच्या सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या रेकॉर्डवर आहे. युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक ९६ विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंग आता या आकड्यापासून फक्त ४ विकेट्स दूर आहे. एवढेच नाही तर अर्शदीपकडे टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून भुवीचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
४७ – भुवनेश्वर कुमार
३७ – अर्शदीप सिंग
३० – जसप्रीत बुमराह
२० – वॉशिंग्टन सुंदर
१८ – आशिष नेहरा
1१९ – अक्षर पटेल</p>
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
कसोटी – कपिल देव (४३४)
एकदिवसीय – जवागल श्रीनाथ (३१५)
टी-२० – अर्शदीप सिंग (९२)*