Arshdeep Singh T20I Wickets: भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या टी-ै० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या २ षटकात २ विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर टाकलं. इंग्लंडने खातही उघडल नसताना अर्शदीपने पहिली विकेट घेत भारताचं मात्र खात उघडलं. या २ विकेट्स घेत अर्शदीपने मोठा इतिहास लिहिला आहे.
अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल सॉल्ट आणि त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात बेन डकेटची विकेट घेतली. यासह, तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आणि त्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. अर्शदीपने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या नावावर आता ९७ टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. चहलने टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एकूण ९६ विकेट घेतल्या होत्या.
T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
अर्शदीप सिंग- ९७ विकेट्स
युझवेंद्र चहल – ९६ विकेट्स
भुवनेश्वर कुमार- ९० विकेट्स
जसप्रीत बुमराह- ८९ विकेट्स
हार्दिक पांड्या- ८९ विकेट्स
२०२२ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण
अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणातील महत्त्वाचा गोलंदाज राहिला आहे. अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने भारतात आणि भारताबाहेरील सामन्यांमध्येही प्रभावित केलं आहे. भारताला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने १७ विकेट्स घेतले होते.
भारताने इंग्लंडला १३२ धावांवर केलं सर्वबाद
भारताच्या गोलंदाजांनी पहिल्याच टी-२० सामन्यात इंग्लंड संघाच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. भारताच्या गोलंदाजांसमोर जोस बटलरशिवाय इंग्लिश संघाचा कोणताच फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. भारताने इंग्लंडला १३२ धावांवर सर्वबाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. इंग्लंडकडून जोस बटलरने ६८ धावांची खेळी केली. याशिवाय हॅरी ब्रुक आणि अर्शदीप, हार्दिक आणि अक्षर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर वरूण चक्रवर्तीने ३ विकेट्स घेतल्या.