ICC Mens T20I Cricketer of the Year 2024 : आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये चार खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये भारताचा एक, ऑस्ट्रेलियाचा एक, पाकिस्तानचा एक आणि झिम्बाब्वेचा एक खेळाडू आहे. या सर्व खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने या वर्षात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे यादीत कोणते चार खेळाडू कोण आहेत? जाणून घेऊया.
या भारतीय खेळाडूला मिळाले नामांकन –
टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे नाव देखील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. अर्शदीप सिंग दीर्घकाळापासून टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २०२४ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही अर्शदीपची कामगिरी चांगली होती. यावर्षी अर्शदीपने १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत.
बाबर आझम –
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम देखील आयसीसी टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरच्या शर्यतीत आहे. या यादीत त्याचे नाव पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. बाबरने २०२४ मध्ये २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३३.५४ च्या सरासरीने ७३८ धावा केल्या, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ७५ होती. बाबरसाठी हे वर्ष काही खास नसावे, पण गेल्या १२ महिन्यांत, त्याच्या इतक्या टी-२० मध्ये इतर कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाने धावा केल्या नाहीत. त्याने सहा अर्धशतके आणि जवळपास शंभर चौकार ठोकले आहेत.
u
सिकंदर रझा –
झिम्बाब्वेचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने चालू वर्षात २४ सामन्यांत २८.६५ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या आहेत. नाबाद १३३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गोलंदाजीतही त्याने आपली छाप सोडली. रझाने २४ विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १८ धावांत पाच विकेट्स.
हेही वाचा – IND vs AUS : जसप्रीत बुमराहच्या भेदक गोंलदाजीनंतर कांगारुच्या शेपटाने भारताला फोडला घाम, घेतली मोठी आघाडी
ट्रॅव्हिस हेड –
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.५ च्या सरासरीने ५३९ धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही ऑस्ट्रेलियनने केलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८० होती. २०१६ मध्ये पदार्पण केल्यानंतर प्रथमच नियमितपणे फलंदाजी करत हेडने ऑस्ट्रेलियाला टी-२० फलंदाज म्हणून आपली क्षमता दाखवली.