Arshdeep Singh says after a few overs I was having trouble breathing : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळविल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीपने सांगितले की, काही षटके टाकल्यानंतरच त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. समुद्रसपाटीपासून मैदानाची उंची जास्त असल्याने तो धापा टाकू लागला. मात्र, असे असतानाही त्याने ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला केवळ ११६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याचा तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवडला गेला.
सामन्यानंतर बोलताना अर्शदीप सिंग म्हणाला, ‘मला थोडं थकल्यासारखं वाटतंय पण हा क्षण खूप छान आहे. यासाठी मी संघ व्यवस्थापनाचे आभार मानतो. हे मैदान इतर मैदानांपेक्षा खूप वेगळे आहे. जेव्हा काही षटके टाकल्यानंतर मला धाप लागायला लागली, तेव्हा मला या मैदानाची समुद्रसपाटीपासूनची उंची लक्षात आली.’
‘राहुल भाई म्हणाले ५ विकेट्स घ्यायच्या आहेत’ –
अर्शदीप सिगं पुढे म्हणाला, ‘देशासाठी खेळणे हे एक स्वप्न असते आणि जेव्हा तुम्हाला ते साकार करण्याची संधी मिळते, तेव्हा खूप आनंद होतो. मी माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे. मला राहुल भाईंचे आभार मानायचे आहेत. मी जोरदार पुनरागमन करून पाच विकेट घेण्याचे लक्ष्य ठेवावे, असे तो म्हणाला होता.’ पुढील दोन सामन्यांच्या तयारीशी संबंधित प्रश्नावर अर्शदीप म्हणाला, ‘गकेबरहाला गेल्यावर तिथेही चांगल्या निकालासाठी मेहनत करावी लागेल.’
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा अर्शदीप भारताचा चौथा गोलंदाज ठरला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ५ बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
५/६ – सुनील जोशी, नैरोबी, १९९९
५/२२ – युजवेंद्र चहल, सेंच्युरियन, २०१८
५/३३ – रवींद्र जडेजा, कोलकाता, २०२३
५/३७ – अर्शदीप सिंग, जोहान्सबर्ग, २०२३