वर्ल्डकपपूर्वी स्वत:च्या आदर्शाला अर्थात जॅक कॅलिसला भेटलेल्या महाराष्ट्राच्या अर्शिन कुलकर्णीने शतकी खेळीसह भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अर्शिनच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अमेरिकाला २०१ धावांनी नमवलं. भारताचा या स्पर्धेतला हा तिसरा विजय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लोमफाऊंटन इथल्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३२६ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर अर्शिनने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. मुशीर खानने ६ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ चेंडूत १५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कर्णधार उदय सहारनने ३५ तर प्रियांशू मोलियाने २७ धावा केल्या. अमेरिकेकडून अतींद्र सुबमण्यमने २ विकेट्स पटकावल्या.

अमेरिकेने ५० षटकं खेळून काढली पण त्यांना १२५ धावांचीच मजल मारता आली. नमन तिवारीने ९ षटकात २० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या. यातली ३ षटकं निर्धाव होती. सामी पांडेने १० अतिशय टिच्चून गोलंदाजी करत १०-२-१३-१ असा अफलातून स्पेल टाकला. मुशीर खानने गोलंदाजी करताना १० षटकात अवघ्या २२ धावाच दिल्या. भारतीय संघाने १० निर्धाव षटकं टाकली. अर्शिनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी मुशीरच्या शतकाच्या आधारे भारताने आयर्लंडला २०१ धावांनी हरवलं. सलामीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर ८४ धावांनी विजय मिळवला. भारताची पुढची लढत ३० जानेवारीला न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघाच्या नावावर या स्पर्धेची पाच जेतेपदं आहेत. भारतीय संघ जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी आतूर आहे.

सोलापूरचा अर्शिन अष्टपैलू खेळाडू असून, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला आदर्श मानतो. वर्ल्डकपच्या निमित्ताने अर्शिनला कॅलिसला याचि देही याचि डोळा भेटता आलं. घरी भिंतभर मोठं तुमचं पोस्टर आहे. माझ्या आजीने तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तुम्ही त्याला उत्तर दिलं होतं. तुम्हाला भेटायचंच होतं. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण आहे असं अर्शिनने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं. कॅलिसने अर्शिनला शाबासकी देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने २० लाख रुपये मोजून अर्शिनला ताफ्यात दाखल केलं. फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर दुर्मीळतेने तयार होतात. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्या अर्शिन उत्तम सांभाळतो. विनू मंकड U19 वनडे स्पर्धेत तसंच U19 आशिया चषकात त्याने चांगली कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshin kulkarni scores hundred as india beats usa in u19 world cup psp