प्रशांत केणी
सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी, अमोल मुझुमदार यांच्यासारखे एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांचे गुरुकुल सर्वश्रुत आहे. परंतु निष्णात प्रशिक्षकांचे विद्यापीठ म्हणूनसुद्धा त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. मुंबईतील यशस्वी प्रशिक्षकांमध्ये आचरेकर यांच्या शिष्यांची गणना केली जाते.
सोमवारी वयाची ८६ वर्षे पूर्ण करणाऱ्या आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारे बलविंदर संधू, लालचंद रजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. यापैकी अनेकांनी मुंबईला रणजी विजेतेपदसुद्धा जिंकून दिले आहे. रजपूत सध्या झिम्बाब्वेचे प्रशिक्षक आहेत. माजी क्रिकेटपटू पंडित यांनी गतवर्षी विदर्भाला प्रथमच रणजी जेतेपदाचा मान मिळवून देण्याची किमया साधली होती. अमरे यांनी आयपीएलमधील प्रशिक्षकपदासह अजिंक्य रहाणे, सुरेश रैना यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना वैयक्तिक मार्गदर्शन केले आहे.
देशात आदर्श क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने सचिन तेंडुलकरने तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमी सुरू केली. या उपक्रमात त्याच्यासोबत विनोद कांबळीसुद्धा मुलांना मार्गदर्शन करतो. मुझुमदार आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा प्रशिक्षक असणार आहे. रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड यांना घडवणाऱ्या दिनेश लाड यांच्यासह भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार हेसुद्धा आचरेकर यांचे शिष्य आहेत.
प्रशिक्षकांच्या या यादीत आचरेकर सरांनंतर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचे प्रशिक्षकपद सांभाळणारे नरेश चुरी यांच्यासह पांडुरंग साळगावकर, अमित दाणी, विनायक माने, किरण पोवार, ओंकार खानविलकर, संदेश कवळे, राजा अधटराव, मनोज जोगळेकर, जय धुरी, मयूर कद्रेकर, नितीन खाडे, लक्ष्मण चव्हाण, विशाल जैन, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन यांचाही समावेश होतो.
कुटुंब रंगलंय प्रशिक्षणात..
आचरेकर यांची मुलगी कल्पना मुरकरने बीसीसीआयचा प्रथमस्तरीय प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला असून, गेली २७ वर्षे ती आचरेकर क्रिकेट अकादमी सांभाळत आहे. सध्या ती मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीची सदस्य आहे. आचरेकर यांचे नातू (मुलीची मुले) प्रदोष मयेकर आणि सोहम दळवी अनुक्रमे रुपारेल आणि कीर्ती महाविद्यालयात मार्गदर्शन करतात. त्यांचा पुतण्या मिलाप आचरेकरसुद्धा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
कोणत्या खेळाडूच्या स्वप्नाचा प्रवास हा प्रशिक्षकासोबत सुरू होतो, त्यांचा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो. आचरेकर सर शिस्तबद्ध आणि प्रेमळ आहेत. त्यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवताना ते कधीही मला ‘छान खेळलास’ असे म्हणाले नाहीत. परंतु ते जेव्हा मला भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला न्यायचे, तेव्हा माझ्या मैदानावरील कामगिरीवर सर खूश आहेत, याची मला खात्री व्हायची. – सचिन तेंडुलकर
आचरेकर सरांनी जे मुंबईच्या क्रिकेटला योगदान दिले आहे. त्याच्या १० टक्केही योगदान मला अद्याप देता आलेले नाही. त्यांनी आम्हाला आत्मीयतेने घडवले, याची आता आम्हाला जाणीव होते आहे. प्रशिक्षक म्हणून खेळाडू घडवताना तोच दृष्टिकोन समोर असतो. माझ्या कारकीर्दीला वळण देणारा तो सामना आचरेकर सरांनी पाहिला नसता, तर मी प्रवीण अमरे म्हणून घडूच शकलो नसतो. -प्रवीण अमरे