जगज्जेतेपदासाठी दिवसेंदिवस बरोबरीत सुटणारे सामने एक प्रकारे सर्वांची उत्कंठा वाढवत आहेत. एखाद्या रहस्यपटात सतत काहीतरी घडत असते, पण प्रेक्षकांना हवे असते ते त्या रहस्याचे उत्तर! ते जितके लांबणीवर पडेल, तितकी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जाते. तसेच काहीसे विश्वविजेता डिंग लिरेन आणि इतिहासातील सर्वांत युवा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यामधील बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत सुरू आहे.
आता डावाचा निकाल गुकेशच्या बाजूने लागणार असे वाटत असतानाच उत्कृष्ट बचाव करून डिंग भारतीयांचे मनसुबे उधळून लावतो आणि पुन्हा रहस्यपट पुढे सुरू राहतो. पहिल्या तीनपैकी दोन डाव निकाली झाल्यावर ही लढत गेल्या वर्षीच्या इयन नेपोम्नियाशी-डिंग यांच्या लढतीसारखी विजय-प्रतिविजय यांनी रंगणार असे वाटू लागले होते. मात्र, अचानक दोघाही खेळाडूंनी अप्रतिम बचाव आणि मानसिक कणखरता दाखवून एकमेकांना आघाडी घेऊ दिलेली नाही.
डिंगकडून भारतीयांचा अपेक्षाभंग
बुडापेस्ट ऑलिम्पियाडमध्ये एकही डाव जिंकू न शकणारा डिंग याच स्पर्धेत पहिल्या पटावर भारतातर्फे देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या गुकेशविरुद्ध पार ढेपाळेल अशी भारतीयांना अपेक्षा असती तर त्यात नवल नव्हते. मात्र, जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी चिनी संघाने खेळलेला हा ‘डाव’ तर नसावा अशी शंका येण्याइतपत डिंग अचानक चांगला खेळू लागला आहे. एखादा कमकुवत मानसिकतेचा खेळाडू अशा वेळी कोलमडून गेला असता. मात्र, गुकेशने पटावर आपले लक्ष केंद्रित करून आतापर्यंत तोडीसतोड खेळ केला आहे.
हेही वाचा >>>VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं?
गुकेशचे विजयाचे प्रयत्न
आव्हानवीर गुकेश प्रत्येक डाव निकराने का लढत आहे, असे रसिकांना वाटणे साहजिक आहे. गतवर्षी जगज्जेतेपद मिळवल्यानंतर काही काळातच डिंगला नैराश्य आल्याच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे जगज्जेता कधीना कधी आपली एकाग्रता गमावेल आणि आपण त्याचा फायदा घेऊ असे गुकेशला वाटत असावे. तसेच ३२ वर्षीय डिंगपेक्षा खूपच तरुण असणारा गुकेश जास्त चैतन्यशील आहे. त्यामुळे हा तरुण आव्हानवीर पूर्ण ताकदीने प्रत्येक डाव खेळत आहे. मात्र, त्यामागे आणखी एक कारण आहे.
जलदगतीत डिंग वरचढ
जर लढत ७-७ गुणांवर बरोबरीत राहिली तर कोंडी फोडण्यासाठी जलदगतीने ‘टायब्रेकर’ खेळवले जातील आणि इथेच गुकेश मागे पडतो. जागतिक जलदगती क्रमवारीत डिंग लिरेन (एलो २७७६ गुण) दुसऱ्या, तर गुकेश (२६५४) पार मागे म्हणजे ४६व्या क्रमांकावर आहे.
गेल्या वेळी डिंगने आपले विश्वविजेतेपद ‘टायब्रेकर’च्या जलदगती सामन्यात नेपोम्नियाशीला पराभूत करून मिळवले होते हा इतिहास विसरता येणार नाही. अजूनही पाच पारंपरिक डाव बाकी आहेत आणि ‘टायब्रेकर’चे घोडामैदान दूर आहे. तोपर्यंत गुकेश विजयाचा निकराने प्रयत्न करेलच आणि त्याने आपले जलदगती खेळाचे कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न केला असेलच. माजी जलदगती विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने त्याला आपल्या अकादमीच्या पंखाखाली घेतले, ते उगाच का?
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)