ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल १२ वर्षे बेदी यांनी  भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले. चेंडूला उंची देताना चेंडूवर असणारे त्यांचे नियंत्रण पुढे अभावानेच फिरकी गोलंदाजांना जमले. कसोटी क्रिकेटमध्ये ३१ डिसेंबर १९६६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी कोलकात्यात पदार्पण केले. त्यानंतर १९७९ पर्यंत ते भारतीय संघाचे अविभाज्य घटक बनून राहिले होते. सलग १३ वर्षे भारतीय संघात टिकून राहायचे ही सोपी गोष्ट नाही. यातही २२ सामन्यांत त्यांनी संघाचे नेतृत्वही केले. यात भारताने केवळ सहा सामने जिंकले. अर्थात, तो काळ वेगळा होता. भारतीय संघाची ताकद ही केवळ आणि केवळ फिरकी गोलंदाजीवर अवलंबून होती. क्रिकेट हे त्यांच्या रक्तात होते. त्यामुळे निवृत्तीनंतरही स्वस्थ बसले नाहीत. कधी प्रशिक्षक, तर कधी व्यवस्थापक आणि पुढे जाऊन निवड समिती सदस्य असे ते क्रिकेटशी जोडलेच गेले.

हेही वाचा >>> फिरकी पर्वातील सुवर्ण अध्यायाची अखेर!

फिरकी गोलंदाजीमध्ये जेव्हा जेव्हा ‘आर्मर’ची चर्चा होते, तेव्हा बेदी यांचेच नाव सर्वप्रथम समोर येते. लेग—स्पिन  गोलंदाजाने टाकलेला ‘गुगली’इतका हा चेंडू बेदी यांनी अजरामर केला. बेदी यांचे हे मुख्य अस्त्र होते. कारकीर्दीमधील बहुतेक बळी त्यांनी याच चेंडूवर मिळवले. फलंदाज वर्चस्व राखायला लागला की बेदी या चेंडूचा खुबीने वापर करायचे. सांगून खरेही वाटणार नाही, पण त्यांनी नॉर्दम्प्टनशायरकडून खेळताना इंग्लिश कौंटी क्रिकेटही गाजवले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये १९६१-६२ मध्ये त्यांनी पंजाबकडून रणजी पदार्पण केले; पण त्यांनी पुढे नवी दिल्ली संघाचेच प्रतिनिधित्व केले. तब्बल ८ वर्षे ते दिल्ली संघाचे कर्णधार होते. 

हेही वाचा >>> Bishan Singh Bedi: “तुम्ही सचिनला कसं आऊट कराल?” विचारणाऱ्या शेन वॉर्नला बिशन सिंग बेदींनी दिला ‘हा’ सल्ला; पुढच्याच सामन्यात…!

मैदानाबाहेरही बेदी यांचे व्यक्तिमत्त्व वादळी होते. गोलंदाजी करायची सोडली, तरी ते निवृत्तीनंतर अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात सापडले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉनी लिव्हरला चेंडूला व्हॅसलिन लावताना बेदी यांनीच पकडले होते. त्यानंतर १९७६ मध्ये विंडीजमध्ये तुफानी गोलंदाजीच्या कारणामुळे भारताचा डावच त्यांनी घोषित केला होता. इतकेच नाही, तर पंचांचा निर्णय चुकीचा असूनही तो स्वीकारण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. यामुळे जिंकत आलेला सामना भारताला गमवावा लागला होता.  बेदी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्यांना मुंबईच्या क्रिकेटने चांगले प्रभावित केले होते. साधारण ९०च्या दशकातील एक किस्सा आठवतो. विंडीज दौऱ्यात भारतीय संघ साफ अपयशी ठरला होता. तेव्हा भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलताना बेदी यांनी संघातील सर्व खेळाडूंना अरबी समुद्रात बुडवायला हवे, अशी टीका केली. पुढे जाऊन ते असे म्हणाले, त्यांच्या जागी मुंबईचा संघ खेळवला असता तरी चालले असते, कारण मुंबईचे खेळाडू अधिक जिगरबाज खेळ करतात. ‘बीसीसीआय’ आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाविरुद्ध तर त्यांनी अनेकदा टीका केली. अलीकडेच फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम करण्यात आले तेव्हादेखील बेदी यांनी विरोध केला होता. अशा या वादळी व्यक्तिमत्त्वाने आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about cricketer bishan singh bedi aggressive personality zws