तुषार वैती
१९७५ नंतर हॉकी विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या ध्येयाने वाटचाल करणाऱ्या भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आणि नेदरलँड्सने तमाम हॉकीप्रेमींच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा केला. भारतीय संघ इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज असताना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर यजमान संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. पण मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे पेलता आले नाही. साखळी फेरीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन केल्यामुळे विजेतेपदापासून फक्त काही पावले दूर असलेला भारतीय संघ हे सुवर्णअभियान नक्की यशस्वी करेल, अशीच हॉकीचाहत्यांना आशा होती. पण भारताने सर्व चाहत्यांचा अपेक्षाभंग केला.
बचावात्मक हॉकीकडून भारताने आक्रमक खेळाकडे वाटचाल केली असली तरी मोक्याच्या क्षणी दडपणाची परिस्थिती हाताळण्यात भारतीय संघ नेहमीच कमी पडत आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आशियाई चषक स्पर्धेतही सर्व प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवल्यानंतर उपांत्य फेरीचा अडसर पार करून भारताला २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठीचे स्थान पक्के करायचे होते. पण भारतीय संघ मलेशियाविरुद्ध गाफील राहिला आणि पेनल्टी-शूटआऊटमध्ये हार पत्करावी लागली. विश्वचषक हॉकी स्पर्धेतही दडपणाची परिस्थिती हाताळण्यात भारतीय संघ कमी पडला, असेच म्हणता येईल. सामन्यात सुरुवातीला गोल करून आघाडी घेतल्यावर भारतीय संघाने नेदरलँड्सवर दबाव आणण्याची गरज असताना यजमानांनी नेदरलँड्सला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली.
मिळालेल्या संधीचे गोलात रूपांतर करण्याऐवजी चेंडूवर ताबा मिळवण्यात आणि अचूकपणे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवण्यात भारतीय खेळाडू कमी पडले. त्याउलट नेदरलँड्सने दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रतिहल्ले चढवून भारतीय बचावपटूंवर दबाव वाढवला. आकाशदीप सिंग, सिमरनजीत सिंग आणि ललित उपाध्याय यांनी तवा गरम असताना हातोडा मारण्याची गरज होती. पण नेदरलँड्सचा गोलरक्षक पिरमिन ब्लाकने भारताची सर्व आक्रमणे परतवून लावली. नेदरलँड्सच्या बचावपटूंनीही भारताचे सर्व प्रतिहल्ले हाणून पाडले. तिसऱ्या सत्रात भारताला मिळालेल्या एका पिवळ्या कार्डमुळे एका खेळाडूला १० मिनिटे बाहेर जावे लागले. त्यानंतर चौथ्या सत्रात नेदरलँड्सने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी घेतली आणि भारताला संकटात टाकले.
भारताच्या बचावपटूंनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामुळेच चार सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला फक्त पाच गोल भारतावर लादता आले. त्यातही दोन गोल हे पेनल्टीकॉर्नरवर झाले. सुरेंदर कुमार, वरुण कुमार आणि हरमनप्रीत सिंग यांनी नेदरलँड्सला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नव्हती. पण थिएरी ब्रिंकमनने दूरवरून मारलेला फटका अन्य खेळाडूच्या स्टिकला लागून गोलजाळ्यात गेला आणि नेदरलँड्सला बरोबरी साधता आली. तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात नेदरलँड्सचे सर्व प्रतिहल्ले भारतीय बचावपटूंनी परतवून लावले. सततच्या हल्ल्यांमुळे दबाव वाढत असतानाच अखेरच्या क्षणी मिळालेल्या पेनल्टीकॉर्नरवर नेदरलँड्सने गोल केला. पण या स्पर्धेत भारताचा भक्कम बचाव भेदणे दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, कॅनडा आणि नेदरलँड्ससारख्या संघांना शक्य झाले नाही.
गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे अपयश हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणता येईल. हॉकीमध्ये गोलरक्षकाची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. श्रीजेश अनेक वेळा भारतासाठी तारणहार ठरला आहे. पण उपांत्यपूर्व सामन्यात श्रीजेशच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्याचाच फटका भारताला बसला. नेदरलँड्सने केलेला पहिला गोल श्रीजेशला सहजपणे अडवता आला असता. पण गोल होणारच नाही, या भ्रमात असलेल्या श्रीजेशने चेंडू अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
सध्याच्या आधुनिक हॉकीत जो संघ अधिकाधिक पेनल्टीकॉर्नर मिळवतो, त्या संघाच्या विजयाच्या आशा कमालीच्या उंचावतात, ही वस्तुस्थिती आहे. पण अनेक वेळा नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात मजल मारूनही पेनल्टीकॉर्नर मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारताने मैदानी गोलांवर भर दिला. स्पर्धेदरम्यान भारताने तब्बल १३ गोल लगावले. त्यापैकी फक्त पाच गोल हे पेनल्टीकॉनरवर लगावले गेले. नेदरलँड्सविरुद्धही भारताला फक्त दोन पेनल्टीकॉर्नर मिळवता आले तर पाहुण्यांनी पाच पेनल्टीकॉर्नरची कमाई केली. १० मिनिटे शिल्लक असताना नेदरलँड्सने मिळालेल्या सुवर्णसंधीचे गोलमध्ये रूपांतर केले. या स्पर्धेत प्रतिस्पध्र्याचे पेनल्टीकॉर्नर हे श्रीजेशपेक्षा अमित रोहिदासनेच अधिक अडवले. पण पिवळे कार्ड मिळाल्याने तो बाहेर असल्याचा फायदा नेदरलँड्सने उठवला.
आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर विश्वचषक हॉकी स्पर्धेतही पंचांची सदोष कामगिरी भारताला मारक ठरली. नेदरलँड्सचे खेळाडू अधिक आक्रमक देहबोलीने खेळत असतानाही पंचांनी त्यांच्या एकाही खेळाडूवर कारवाई केली नाही. पण भारताच्या दोन खेळाडूंना काही मिनिटांसाठी पंचांनी मैदानाबाहेर घालवले. भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनीही याविरोधात आवाज उठवला, पण आता त्याचा काहीच फायदा होणार नाही. घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर भारताला गंभीरपणे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करावे लागणार आहे.