दीपक जोशी
दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात सोमवारी सामना होणार आहे. या दोन संघांमध्ये सहा वेळा विश्वचषकात सामना झाला असून, चार वेळा दक्षिण आफ्रिका व दोन वेळा वेस्ट इंडिजचा संघ जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाकडून थोडय़ाशाच फरकाने पराभूत झाल्यामुळे विंडीजचा संघ आज पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे, तर सलग तीन सामन्यांत पराभूत झाल्यामुळे आफ्रिकेचा संघ विजयी मुसंडी मारण्यासाठी उत्सुक आहे. हशिम अमलाला आठ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ७१ धावांची आवश्यकता आहे. हा टप्पा गाठणारा तो चौथा आफ्रिकेचा खेळाडू ठरणार आहे. डेव्हिड मिलरला तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी नऊ धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो १७वा आफ्रिकेचा खेळाडू ठरेल. यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने (१६२) चार झेल टिपल्यास डेव्ह रिचर्डसनला (१६५) तो मागे टाकू शकेल. वेस्ट इंडिजतर्फे ख्रिस गेलने एक झेल घेतल्यास तो कार्ल हुपरला मागे टाकेल. शिम्रॉन हेटमेयरला एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ७३ धावा हव्या आहेत. अश्ले नर्सच्या खात्यावर ४९ बळी जमा असून, बळींचे अर्धशतक साकारणारा तो ३४वा गोलंदाज ठरेल.