सिद्धार्थ खांडेकर
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गेली काही वर्षे ऑस्ट्रेलियन कुकाबुरा चेंडू वापरले जात आहेत. जगातील अनेक क्रिकेट मंडळांनी कुकाबुरा चेंडूंना पसंती दिल्यामुळे आणि ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्येही तेच वापरले जात असल्यामुळे क्रिकेट चेंडूंच्या जगतात कुकाबुराचे साम्राज्य फोफावलेले दिसते. पण काही मोठय़ा क्रिकेटपटूंनी कुकाबुरा चेंडूंविषयी नारीजाचा सूर आळवला होता. याचे कारण दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या चेंडूंच्या तुलनेत, कुकाबुराचा चेंडू तुलनेने कमी स्विंग होतो आणि त्यामुळे अधिक फलंदाजस्नेही ठरतो. यातून स्पर्धा पुरेशी निकोप राहात नाही. विशेष म्हणजे, ‘आयसीसी’च्या सर्व स्पर्धासाठी कुकाबुरा चेंडू वापरला जात असला, तरी असा चेंडू वापरण्यासंबंधी कोणताही नियम नाही! त्याऐवजी, स्पर्धेचा यजमान देश असलेल्या क्रिकेट मंडळाला त्या देशात प्रचलित असलेला चेंडू वापरण्याची मुभा राहील, असे ‘आयसीसी’चा नियम सांगतो. त्या नियमाचा अवलंब करायचा झाल्यास इंग्लंडमध्ये डय़ुक्स चेंडूंचा वापर सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत व्हायला हवा होता. पण तसे झालेले नाही. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची क्रिकेट मंडळे कसोटींसाठी डय़ुक्स चेंडूंचा वापर करतात. भारतात एसजी या स्थानिक ब्रँडच्या चेंडूचा वापर होतो. परंतु या सर्व देशांत मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी कुकाबुराच वापरले जातात. कुकाबुरा ही ऑस्ट्रेलियन कंपनी. १९७७ मधील वर्ल्ड सीरिज कपपासून या चेंडूचा वापर सुरू झाला होता. त्या वेळी पहिल्यांदा पांढऱ्या चेंडूंचा वापर झाला होता. त्यानंतर पांढरे चेंडू आणि कुकाबुरा हे नाते निश्चित झाले.
वास्तविक डय़ुक्स हा सर्वाधिक जुना क्रिकेट चेंडूचा ब्रॅण्ड. १७६० पासून डय़ुक्स चेंडू बनवले जातात. पहिल्या चारही विश्वचषक स्पर्धासाठी डय़ुक्स चेंडू वापरले गेले. १९९२ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा वर्ल्ड सीरिजच्या धाटणीत म्हणजे रंगीत पोशाख, पांढरे चेंडू, काळ्या साइटस्क्रीन्स, विद्युतझोतात खेळवल्या गेल्या. १९९२ पासून कुकाबुरा चेंडू विश्वचषक स्पर्धामध्ये वापरले जाऊ लागले. अपवाद १९९९च्या विश्वचषक स्पर्धेचा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय एकदिवसीय मालिकाही वर्ल्ड सीरिजप्रमाणेच खेळवल्या जाऊ लागल्या. अल्पावधीत रंगीत पोशाख आणि पांढरे चेंडू ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटची ओळख बनून गेली. कुकाबुराचा साम्राज्यविस्तार अशा प्रकारे झाला. १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या स्पर्धेत डय़ुक्सचे पांढरे चेंडू वापरले गेले होते. त्या स्पर्धेत चेंडू भरपूर स्विंग व्हायचा. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील द्वंद्व तुलनेने समतोल होते. भारतातही १९९०च्या उत्तरार्धात सन्सपॅरिल्स ग्रीनलॅण्ड किंवा एसजी कंपनीतर्फे पांढरे चेंडू बनवले जाऊ लागले.
येथे एक मेख होती. कुकाबुरा हे सर्वाधिक वापरले जाणारे चेंडू असले, तरी ते सर्वाधिक टिकाऊ आणि दर्जेदार चेंडू नक्कीच नाहीत. याचे एक कारण म्हणजे, डय़ुक्स आणि एसजीच्या शिवणीच्या सर्व सहा रेखा हाताने शिवल्या जातात. शिवाय चेंडूच्या दोन्ही भागांतून त्या नागमोडय़ा (बुटांच्या नाडय़ांसारख्या) शिवल्या जातात. त्यामुळे या चेंडूंची शिवण घट असते आणि बराच काळ तशी टिकून राहते. डय़ुक्स चेंडूंना भारतीय उपखंडात शिवण घातली जाते. याउलट कुकाबुराच्या शिवणीतील सहापैकी मधल्या दोन रेखाच हाताने शिवल्या जातात. बाहेरील प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार रेखा मशीनने शिवल्या जातात. त्यामुळे त्या बऱ्याचदा लवकर उसवल्या जातात. त्यामुळेच तो लवकर वेडावाकडा आणि खराब होतो. यासाठीच प्रत्येक डावासाठी दोन चेंडू वापरण्याची प्रथा सुरू झाली. गंमत म्हणजे, अशा प्रकारे डय़ुक्स किंवा एसजी चेंडू खराब होत नाहीत. उलट ते एक चेंडू बहुतेकदा ५० षटके टिकू शकतो. तरीही आयसीसीला कुकाबुरा चेंडूंचा सोस कशासाठी, असा सवाल या दोन कंपन्या उपस्थित करतात. प्रत्येक डावात दोन-दोन चेंडू वापरावे लागल्यामुळे कुकाबुरा चेंडू अधिक वापरावे लागतात, शिवाय त्यांची किंमतही अधिक असते. असे चेंडू वापरल्याचा अधिक फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो, कारण चेंडू बराच काळ कडक राहतो. याउलट डय़ुक्स आणि एसजी चेंडू विशिष्ट काळानंतर रिव्हर्स स्विंग होऊ लागतात. पण बळींपेक्षा धावांना सध्या भाव असल्यामुळे डय़ुक्स किंवा एसजी हे कसोटी क्रिकेटपुरतेच मर्यादित राहतात.