बलवान सिंग यांचा ‘कबड्डी हाच श्वास’
प्रशिक्षक म्हटले की आपल्यासमोर उभे राहते गंभीर व्यक्तिमत्त्व. खेळाडूंना डगआऊटमध्ये बसून वारंवार सूचना करणारा, त्यांच्या चुकीवर नाराजी व्यक्त करून कानउघाडणी करणारा, विजयानंतर खेळाडूंसोबत जल्लोष करणारा. पण या सर्व बाबतीत त्याचे गंभीर रूपच सर्वासमोर उभे राहते आणि तेच लक्षात राहते. प्रो कबड्डी लीगमध्येही आठ संघांमधले बहुतेक प्रशिक्षक याच श्रेणीतले. परंतु यात स्वत:चे वेगळेपण जपले आहे ते जयपूर पिंक पँथर्सच्या ५७ वर्षांच्या बलवान सिंग या तरुण प्रशिक्षकाने. तरुण यासाठी की मैदानाबाहेर आणि मैदानावरील त्यांचा वावर हा तरुणांनाही लाजवणारा आहे. साठीजवळच्या या प्रशिक्षकाचा तिशीतला उत्साह कबड्डीप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला आहे.
बंगळुरू आणि कोलकाता टप्प्यात जयपूर पिंक पँथर्सच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान प्रत्येक संघाचे प्रशिक्षक सरावाप्रसंगी मदानाबाहेरून खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसले. मात्र बलवान हे स्वत: पकडी आणि चढाई करत होते. ‘‘कबड्डीत वय काय पाहायचे. माझ्या हृदयात कबड्डी आहे आणि त्यामुळेच खेळाडूंसोबत मीही सरावात सहभाग घेतो. मैदानाबाहेर उभे राहून मार्गदर्शन करण्याइतके वय झालेले नाही,’’ असे बलवान सांगतात.
‘कबड्डी कबड्डी..’ हा त्यांचा श्वास असल्याचे ते मोठय़ा अभिमानाने सांगतात. बलवान यांनी १९८८च्या आशियाई अजिंक्यपद आणि १९८९च्या दक्षिण आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले आहे. सामन्यापूर्वी मैदानाला एक प्रदक्षिणा घालून खेळाडू एका बाजूला उभे राहतात, परंतु बलवान दोन-तीन चकरा मारून खेळाडूंचे मनोबल उंचावतात. याबाबत त्यांना विचारल्यास ते म्हणाले, ‘‘माझ्या या कृतीने खेळाडूंना प्रेरणा मिळते. ते अधिक जोशात खेळतात आणि संघासाठी तेच फायद्याचे आहे. लहानपणापासून हा खेळ खेळतोय. त्यामुळे मैदानाला चकरा मारणे, ही सवयच झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढावा म्हणून एक फेरी जास्त मारतो.’’
इतकी धावपळ करून दमायला होत नाही का, या प्रश्नाने उत्तर त्यांनी एका दमात न थांबता ‘कबड्डी, कबड्डी’ उच्चार करून दिले. बलवान यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषक स्पध्रेत सहा, तर आशियाई स्पध्रेत तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. ‘‘संघातील खेळाडूंनाही मी तीन मिनिटे श्वास रोखू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी माझ्याशी पैज लावली. त्यावेळी मी स्विमिंगपूलमध्ये उतरलो आणि त्यांना घडय़ाळाकडे लक्ष द्यायला सांगितले. पाण्याखाली मी तीन मिनिटे श्वास रोखू शकतो, हे पाहून तेही अवाक झाले,’’ असा प्रसंग सांगताना बलवान यांच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते. जयपूर पिंक पँथर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे आणि जेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार असल्याचा दावा बलवान यांनी केला.