आपण काय खेळतोय, हातातल्या लाकडी फळीला काय म्हणतात, चेंडूला टोलवायचे कशासाठी? हे कळत नसताना वडिलांनी तिची आवड, थोडासा हट्टीपणा म्हणून तिच्या हाती बॅट आणि बॉल दिला. तीच कालची चिमुरडी म्हणजे आजच्या घडीला कौतुकाचा विषय ठरलेली भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना. कृष्णेच्या पाण्याचा जसा अंदाज पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही येत नाही, तसाच क्रिकेटच्या दुनियेत गोलंदाजाच्या वेगवान किंवा फिरकी चेंडूलाही आपल्या बॅटच्या तडाख्याचा अंदाज न देणारी डावखुरी फलंदाज म्हणजे स्मृती.
वयाच्या विसाव्या वर्षी स्मृतीने जागतिक पातळीवरील क्रिकेट क्षेत्राचे लक्ष वेधले असले तरी वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिने सांगलीच्या कृष्णाकाठच्या कसदार मातीत आपल्या खेळाचे वेड जोपासले. वडील श्रीनिवास मानधना मोठा मुलगा श्रवणच्या क्रिकेट कारकीर्दीसाठी मदानावर जात असायचे. याच वेळी मीसुद्धा येणार म्हणून सकाळच्या वेळी तीच अगोदर वडिलांच्या स्कूटरवर जाऊन बसत होती. मदानावर गेल्यानंतर भाऊ श्रवण डाव्या हाताने चेंडूला टोलावतो, तो चेंडू पळत जाऊन परत आणणे, हे आपलेच काम आहे, अशा समजुतीतून तिचे क्रिकेटवेड वाढत गेले. भाऊ डाव्या हाताने बॅट धरतो, मग तसा नियमच असावा असा ग्रह करून आज ती डावखुरी फलंदाज झाली असली तरी तिच्या अन्य सर्व सवयी उजव्या हाताच्याच आहेत. अगदी शाळेत लिखाण करताना तिचा उजवा हातच पुढे असायचा.
दहावीपर्यंत स्मृतीने कुपवाडच्या कृष्णा व्हॅलीस्कूलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले. दहावीला तिने ८६ टक्के गुण मिळवताना क्रिकेटचे वेडही जोपासले. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संघातही स्थान पटकावले. वयाच्या ११व्या वर्षी तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चौफेर विकास करण्यासाठी क्रिकेटकरिता वेळही खूप दिला.
आज सांगलीच्या चिंतामणराव महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण ती घेत आहे. हे शिक्षण घेत असताना ती दररोज सहा-सात तास क्रिकेटच्या सरावाला वेळ देते. तिच्यासोबत सरावासाठी सातत्याने असणारे तिचे प्रशिक्षक अनंत तांबवेकर सांगतात की, ‘‘आज स्मृतीने मिळवलेले यश हे तिच्या सरावातील सातत्याचे आहे. तिला एकदा सांगितले की, ती गोष्ट साध्य करण्यासाठी ती सतत सराव करीत राहते. तिला जोपर्यंत स्वत:चे समाधान होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा ती पिच्छा पुरवत राहते.’’
मितभाषी स्मृती खेळाकडेच जास्त लक्ष केंद्रित करीत असल्याने मत्रिणींचा गोतावळाही कमी आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी तिचे प्रयत्न जसे कारणीभूत आहेत, तसेच तिला घरातून मिळालेला पािठबा आणि साथही मोलाची ठरली असल्याचे प्रशिक्षक तांबवेकर सांगतात. इंग्लंडमधील हवामानाला तोंड देण्यासाठी काय करावे लागेल, याचे तांबवेकर यांनी दिलेले धडे स्मृतीला उपयुक्त ठरले.
‘‘दिवसभर नुसता क्रिकेटचाच विचार करणारी, क्रिकेट जगणारी स्मृती फावल्या वेळेचा उपयोग गाणी ऐकण्यासाठी करते. तिची जिद्द आणि आवड यामुळेच तिचे सरावात सातत्य राहिले. एकदा सांगितलेली क्लृप्ती जमेपर्यंत ती माघार घेत नाही अथवा सरावातील सातत्य थांबवत नाही, हेच तिच्या यशाचे गमक म्हणावे लागेल,’’ असे प्रशिक्षक अनंत तांबवेकर अभिमानाने सांगतात.
‘‘खेळात सातत्य राहण्यासाठी, शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी काय करावे, हे सांगितले तर ती केवळ त्याच पद्धतीने व्यायाम आणि सराव करत राहते. सकाळी सहा वाजता मदानावर यायला सांगितले, तर पाच मिनिटे अगोदर येऊन व्यायाम सुरू करणार, हे तिचे सातत्यच तिला आजच्या यशापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरले,’’ असे तंदुरुस्तीतज्ज्ञ एस. एल. पाटील यांची प्रतिक्रियाच तिच्या यशाचे सूत्र सांगते.