अपार कष्ट, जिद्द व त्यासोबत आईची मिळालेली साथ या बळावर कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते, हे नागपूरकर क्रिकेटपटू मोना मेश्रामने सिद्ध करून दाखवले. दहा बाय दहाच्या दोन छोटय़ा खोल्यांमध्ये राहणाऱ्या मोनाने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मदानावर झेप घेतली. यशामागे जसे तिचे श्रेय आहे, तसेच तिची आई छाया मेश्राम यांचेही आहे, कारण जेव्हा मोना अगदी पाच वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील राजेश मेश्राम हे घर सोडून निघून गेले. त्यामुळे तिला वडिलांचे प्रेम हे आईनेच दिले. तिची लहान बहीण सपना ही तेव्हा दोन वर्षांची होती. घरची सर्व जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. अशात तिच्या आईने जेवणाचे डबे तयार करण्याचा छोटा व्यवसाय सुरू करून आपल्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहिली. यासाठी त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. गेली दोन दशके विद्यार्थ्यांसाठी डबे बनवणाऱ्या छाया यांनी मोना व सपना या दोघींनाही क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनवले.
सपना व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू असून तिलादेखील क्रिकेटपटू व्हायचे असल्याने ती सध्या व्हीसीएमध्ये सराव करीत आहे. आजदेखील जेवणाचे डबे बनवण्यावर या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. मोनाची आई छायादेखील शालेय स्तरावर उत्तम कराटेपटू होत्या. अगदी सहज मदानावर गेलेली मोना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाली. तिला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. घरासमोरील मदानावर खेळणारी मोना मुळात व्हॉलीबॉलपटू आहे. शालेय स्तरावर कामगिरी दाखवल्यानंतर तिने प्रथम जिल्हा स्तरावर व त्यानंतर २००४मध्ये राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघात आपली चमकदार कामगिरी दाखवली.
मोना शिकत असलेल्या नूतन भारत शाळेत महिलांच्या क्रिकेट स्पर्धा होत असत. अशात तिने सहज हातात बॅट पकडली आणि थेट शतक झळकावले. त्यानंतर कर्णेवार क्रिकेट क्लबमध्ये तिची फलंदाजी बघून तिला लेदर बॉलने खेळण्याचे धडे दिले. तेव्हापासून तिचा खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रवास सुरू झाला. आंतरक्लब स्पध्रेत अनेक सामने गाजवल्यानंतर ती वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या संघाकडून खेळू लागली. तिची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली. तेथे तिला प्रशांत पंडित यांचे योग्य प्रशिक्षण लाभले. तिने संधीचे सोने करून दाखवले. आज ती विदर्भ महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. २४ जून २०१२ या दिवशी प्रथमच तिने भारतीय महिला संघात स्थान प्राप्त करून आर्यलडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर तिने थेट विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवले. कष्टाचे मोल काय असते, हे मोनाला चांगलेच माहीत आहे. घरची आíथक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिच्याजवळ स्वत:ची किटबॅग नव्हती. ती दररोज दोन वेळा अभ्यंकर नगर येथून सिव्हिल लाइन जवळपास १० किमी सरावासाठी सायकलीने जात असे. किटबॅग नसल्याने ती आपले क्रिकेटचे साहित्य पोत्यामध्ये घेऊन जायची. हे बघून एकदा प्रशिक्षक बाबा रॉक्स यांनी तिला किटबॅगबद्दल विचारणा केली. मात्र पसे आल्यावर आई किटबॅग घेऊन देईल, असे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी रॉक्स यांनी तिला किटबॅग दिली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशात तिच्या कामगिरीत कमालीची सुधारणा दिसू लागली. सध्या ती हैदराबाद येथील प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
‘‘मोना माझ्या पोटी जन्माला आली हे माझे भाग्य आहे. परिस्थितीशी तिने जुळून घेतले. कधीही हट्ट केला नाही. जे मिळेल, त्यात समाधान व्यक्त केले. मात्र खेळाबाबत तिने कधीही हलगर्जीपणा केला नाही. सुरुवातीला मला डबे तयार करण्यात तिने मदतही केली. सोबतच लहान बहिणीसाठी अनेक गोष्टींचा त्यागही केला. ती फार समजूतदार आहे. मात्र आता मला डबे करू नकोस, असे ती सांगते. आई, तू खूप कष्ट केले. आता तुझे कष्ट करण्याचे दिवस संपले. तिला २०१२ मध्ये रेल्वेत नोकरी लागली आणि आमची आíथक परिस्थिती बऱ्यापकी सुधारली. तिची मेहनत मी बघितली आहे. ते दिवस आठवले की डोळ्यांत पाणी येते. मात्र आता तिच्या कामगिरीमुळे डोळ्यांत आनंदाचे अश्रू आहेत,’’ असे तिची आई अभिमानाने सांगते.