टेनिस हा केवळ काही मर्यादित व्यक्तींचा खेळ न राहता सर्वाचाच खेळ झाला आहे. सहाव्या वर्षांपासूनच हातात रॅकेट घेतल्यानंतर अगदी पाऊणशे वय झाले तरीही या रॅकेटद्वारे खेळाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यनगरीने केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर जागतिक स्तरावर या खेळाचा समृद्ध वारसा निर्माण केला आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. दरवर्षी विविध गटाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐंशीहून अधिक स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये अनेक परदेशी खेळाडूही उत्साहाने भाग घेतात, ही येथील टेनिस संघटकांच्या कार्याचीच पावती आहे.

भारत व न्यूझीलंड यांच्यात तीन फेब्रुवारीपासून डेव्हिस चषकाचा सामना सुरू होत आहे. यापूर्वी १९७४ मध्ये पुण्यात डेव्हिस सामना आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी भारताने रशियावर ३-१ अशी मात केली होती. डेक्कन जिमखाना क्लबवरील टेनिस कोर्ट्सवर हा सामना झाला होता. त्या वेळी डेक्कन जिमखाना हेच भारतामधील टेनिसचे प्रमुख केंद्र होते. आताही पुणे शहर हेच टेनिस स्पर्धाच्या केंद्रस्थानी आहे. एटीपी, आयटीएफ, आशियाई मानांकन स्पर्धा, महिलांची जागतिक मानांकन स्पर्धा, चॅलेंजर स्पर्धा, याचप्रमाणे मोठय़ा पारितोषिक रकमांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा यामुळे पुणे शहर हे टेनिसचे माहेरघर झाले आहे.

शशी मेनन, नंदन बाळ, गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, नितीन कीर्तने या डेव्हिसपटूंबरोबरच राधिका तुळपुळे-कानिटकर, राधिका मांडके, कार्तिकी भट, अर्जुन कढे, ऋतुजा भोसले, अर्जुन कढे, ऐश्वर्या श्रीवास्तव, प्रार्थना ठोंबरे आदी अनेक राष्ट्रीय विजेते खेळाडू येथील मातीतूनच तयार झाले आहेत. टेनिसकरिता येथे मिळणाऱ्या सुविधा, सवलती, स्पर्धात्मक सराव, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आदी अनेक कारणास्तव हे शहर केवळ महाराष्ट्रीयन खेळाडूंपुरते मर्यादित राहिलेले नाही. अंकिता रैना, नताशा पालहा, ध्रुव सुनील यांच्यासह अनेक परप्रांतामधील खेळाडूंनादेखील येथे टेनिसमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आहे. प्रार्थनाने ऑलिम्पिक दुहेरीत सानिया मिर्झासारख्या श्रेष्ठ महिला खेळाडूसमवेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अंकिताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे सालसा आहेर, सिद्धांत बांठिया, मल्लिका मराठे, अन्वित बेंद्रे, शरण्या गवारे, गार्गी पवार, परी सिंग, शिवानी इंगळे, यशराज दळवी, आदी अनेक खेळाडूंनी विविध गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी करीत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे.

नंदन बाळ यांनी डेव्हिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण त्याचबरोबर अनेक वर्षे त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. खुद्द लिएण्डर पेस याच्यासारखा महान खेळाडूही वेळोवेळी त्यांच्याकडून मौलिक सल्ला घेत असतो. बाळ यांच्याप्रमाणेच हेमंत बेंद्रे, आदित्य मडकईकर, राधिका तुळपुळे, केदार शहा, संदीप कीर्तने आदी अनेक प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाचा अव्वल दर्जा मिळवला आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर परप्रांतामधूनही येथे प्रशिक्षणासाठी येत असतात. शीतल अय्यर, नितीन कन्नमवार, श्रीराम गोखले, आदी पंचांनी ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्यासह १५हून अधिक जागतिक दर्जाचे पंच पुण्याला लाभले आहेत.

पुण्यात एखादी स्पर्धा सुरू करण्याचा उपक्रम सहसा खंडित पडत नाही. हिलसाइड जिमखान्यातर्फे २५हून अधिक वर्षे दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर मानांकित स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. विशेषत: सबज्युनिअर व कुमार गटातील खेळाडूंसाठी ते स्पर्धा घेत असतात. त्यांच्या स्पर्धेत सहभागी होणारे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले आहेत. सुंदर अय्यर व शरद कन्नमवार यांच्या कुटुंबीयांनी टेनिस खेळाला अक्षरश: वाहून घेतले आहे. त्यामुळेच डेव्हिस चषक सामना आयोजित करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यासाठी भरपूर प्रायोजकत्वाची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या संघटकांच्या समूहाने विविध स्पर्धाचे व टेनिसविषयी विविध उपक्रमांचे अतिशय नीटनेटके आयोजन करीत पुरस्कर्त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य विनियोग झाला, याचे समाधान मिळवून दिले आहे. पावसाळ्यातही आंतरक्लब स्तरावरील स्पर्धा, तसेच विविध वयोगटाची एकत्रित लीग स्पर्धा आयोजित करीत वर्षभर टेनिस कोर्ट्सवर सामने सुरू राहतील, हा त्यांचा उद्देश यशस्वी झाला आहे. पुण्यात टेनिसच्या पन्नासहून अधिक अकादम्या असून पाचशेहून अधिक कोर्ट्सवर सकाळपासून रात्रीपर्यंत टेनिसचा सराव सुरू असतो. ज्येष्ठ डेव्हिसपटू शशी मेनन यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, ‘पुणे शहर हे पुन्हा देशातील टेनिसचे मुख्य केंद्रबिंदू झाले आहे!’

Story img Loader