बुद्धिबळ हा जरी भारतीयांसाठी पारंपरिक खेळ असला तरी या खेळात भारतीय खेळाडू विश्वविजेते होऊ शकत नाहीत, ही टीका सतत एके काळी केली जायची. विश्वनाथन आनंदने भारताला बुद्धिबळातील सोनेरी दिवस दाखवले. तब्बल १४ वष्रे त्याने चौसष्ट चौकडींच्या या खेळावर अधिराज्य गाजवले. तीन वर्षांपूर्वी मॅग्नस कार्लसनने त्याला आव्हान निर्माण केले. आता पुन्हा जगज्जेतेपद गाठणे, हे भविष्यात आनंदसाठी थोडेसे आव्हानात्मकच मानले जात आहे. विशेषत: जागतिक स्तरावर अनेक युवा खेळाडू विश्वविजेतेपदाची दारे ठोठावत असताना त्याच्यासाठी दिवसेंदिवस आव्हान क्लिष्टच होत जाणार आहे. हे लक्षात घेता आनंदचा वैभवशाली वारसा पुढे निर्माण करण्याचे अन्य युवा भारतीय खेळाडूंपुढे आव्हान आहे. कार्लसन आणि सर्जी कर्जाकिन यांच्यात जगज्जेतेपदासाठी लढत चालू असताना भारतातील बुद्धिबळ क्षेत्राचा घेतलेला हा आढावा –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer v3i8cWFS]

विश्वनाथन आनंदने २००० मध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. या विजेतेपदासह त्याने विविध स्वरूपांच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत एकूण पाच वेळा अजिंक्यपद मिळवले. आनंदने २००७ ते २०१३ या कालावधीत विश्वविजेतेपद राखले होते. २०१३ मध्ये नॉर्वे देशाच्या मॅग्नस कार्लसनने त्याच्यावर मात केली व जगज्जेतेपद मिळवले. आपले हे विजेतेपद चमत्कार नाही, याचा प्रत्यय त्याने २०१४ मध्ये दिला व आनंदची मक्तेदारी संपुष्टात आणली. आनंदला त्यानंतर विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्याने अन्य विविध आंतरराष्ट्रीय व प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अव्वल यश मिळवले आहे.

विश्वविजेतेपदासाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धामध्ये प्रवेश मिळवणे हाच एक महत्त्वाचा टप्पा असतो. ज्याप्रमाणे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळवणे हीदेखील स्वप्नवत कामगिरी मानली जाते, त्याप्रमाणेच बुद्धिबळातही विश्वविजेतेपदाच्या पात्रता स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी खूप झगडावे लागते. त्याकरिता सतत जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. आनंदने जेव्हा बुद्धिबळातच कारकीर्द करण्याचे ठरवले, तेव्हापासून त्याला घरच्यांकडून संपूर्ण आर्थिक पाठबळ लाभले. आनंद घडत असताना त्या वेळी बुद्धिबळाकडे प्रायोजक ढुंकूनही पाहात नव्हते. आज बुद्धिबळपटूंना सहजासहजी नोकऱ्या किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध होत असतात. तशी परिस्थिती आनंदच्या वेळी नव्हती. ही गोष्ट लक्षात घेतली तर आनंद व त्याच्या कुटुंबीयांनी किती त्याग केला असेल, याची कल्पना येऊ शकेल.

आनंदने विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशात बुद्धिबळ युग निर्माण झाले. आपल्या देशात आता ३५हून अधिक ग्रँडमास्टर खेळाडू आहेत. जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आनंदबरोबरच पी. हरिकृष्णनेही स्थान मिळवले आहे. विश्वविजेतेपदाच्या पात्रता लढतींमध्ये स्थान मिळवायचे असेल तर अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर अधिकाधिक खेळण्याचा अनुभव मिळवणे आवश्यक आहे. आनंद हा बराच काळ युरोपमधील स्पर्धामध्येच खेळत असतो. तेथे खेळणे सुलभ जावे या दृष्टीने त्याने स्पेनमध्येही आपले आणखी एक घर केले होते. हरिकृष्ण, कृष्णन शशिकिरण, बी. अधिबान, अभिजित गुप्ता यांसारख्या नैपुण्यवान खेळाडूंनी आनंदप्रमाणेच युरोपियन किंवा रशियातील विविध स्पर्धाचा अधिकाधिक अनुभव मिळवला पाहिजे.

आनंदच्या युगाच्या तुलनेत हल्लीच्या भारतीय खेळाडूंना आपल्या देशातच भरपूर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. गुडरिक किंवा पाश्र्वनाथ चषक यासह अनेक स्पर्धाचे आयोजन भारतात केले जात आहे. बुद्धिबळ लीग स्पर्धाही सुरू झाली आहे. पेट्रोलियम, आयुर्विमा, भारतीय विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीयीकृत बँका आदी विविध आस्थापनांमध्ये बुद्धिबळपटूंना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बुद्धिबळाची स्वतंत्र ऑलिम्पिक स्पर्धा होत असली तरी शासनदरबारी त्याला अन्य खेळांच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा दर्जा नसल्यामुळे अन्य आर्थिक सवलती किंवा पुरस्कार मिळवण्याबाबत बुद्धिबळपटूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अर्थात काही वेळा स्वत: त्याग करण्याची आवश्यकता असते.

सायना नेहवाल हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सुरुवातीला बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवताना तिच्या कुटुंबीयांना खूपच खस्ता खाव्या लागल्या होत्या. तिने जागतिक स्तरावर चमक दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रायोजकांची रीघ तिच्याकडे चालून आली. हे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवत युवा बुद्धिबळपटूंनीही आनंदसारखे यश मिळवायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. बुद्धिबळात द्रोणाचार्याच्या स्थानी असलेले रघुनंदन गोखले, प्रवीण ठिपसे, दिब्येंदू बारुआ यांच्यासारखे अनेक गुरू उपलब्ध आहेत. थोडासा स्वयंअभिमान बाजूला ठेवत गुरुस्थानी असलेल्या या व्यक्तींकडून कसे अव्वल दर्जाचे ज्ञान प्राप्त करता येईल याचा विचार केला पाहिजे. जागतिक स्तरावर आपले नाणे खणखणीत केले तर आपोआपच प्रायोजक तुमच्या पायाशी लोळण घेतील, हा विचार केला पाहिजे. अल्पसंतुष्ट न राहता सतत विश्वविजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून त्याग केला तरच तुम्हाला आनंदचा वारसा चालवता येईल, याचा विचार प्रत्येक युवा भारतीय खेळाडूने केला पाहिजे.

[jwplayer kDLYstr7]

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com