अनिश्चिततेचा खेळ असे म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये पाकिस्तान हा अनपेक्षित धक्का देणारा संघ म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानने ११ विश्वचषकांपैकी सहा वेळा उपांत्य फेरी गाठली आहे, ही आकडेवारी त्यांच्या आशा उंचावणारी आहे. त्यामुळे पाकिस्तानला विश्वचषकाच्या दावेदारांमध्ये स्थान दिल्यास वावगे ठरणार नाही.
१९७९मध्ये पाकिस्तानने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आशियाई संघ हा मान मिळवला होता. तेव्हापासून ओळीने तीन उपांत्य फेरीत त्यांना गाशा गुंडाळावा लागला. परंतु अखेरीस १९९२मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली जगज्जेतेपदावर नाव कोरले.
यंदाच्या विश्वचषकासाठी पाकिस्तानने वेगळ्या योजना आखल्या होत्या. परंतु इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-० अस ेनिभ्रेळ यश मिळवल्यामुळे त्यांच्या विश्वचषकाच्या तयारीपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. मात्र अंतिम संघनिवड जाहीर करताना पाकिस्तानने तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ या अनुभवी वेगवान गोलंदाजांसह आसिफ अलीला संघात स्थान दिले आहे. आता विश्वचषकात पाकिस्तानचा संघ कोणते अनपेक्षित धक्के देईल, याबाबत क्रिकेटजगतात उत्सुकता आहे.
अपेक्षित कामगिरी
विश्वचषक स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचे आव्हान पेलणे पाकिस्तानला जड जाते. यंदाच्या विश्वचषकातही तसे घडले तरी या संघाची उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल होऊ शकते. अनुभवी खेळाडूंची कमतरता संघात असली तरी इंग्लिश वातावरणाला अनुकूल वेगवान गोलंदाजीचा ताफा त्यांच्याकडे आहे.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी नव्या मोहऱ्यांवरच विसंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका ०-४ अशी गमावल्यानंतर अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझचा पाकिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २०१९ या वर्षांचा पूर्वार्ध पाकिस्तानसाठी अनुकूल नव्हता. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका त्यांनी २-३ अशा फरकाने गमावली. मग संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध ५-० असे निभ्रेळ यश मिळवले. परंतु विश्वचषकापूर्वी इंग्लंडमध्ये झालेली मालिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
इ ति हा स
१९७५ : पहिल्या विश्वचषकात आसिफ इक्बालच्या नेतृत्वाखाली हा संघ सहभागी झाला. साखळीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून हार पत्करली, तर दुबळ्या श्रीलंकेविरुद्ध एकमेव विजय मिळवला. त्यामुळे बाद फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. कॅरेबियन संघाविरुद्ध पाकिस्तानने चांगली झुंज दिली, परंतु त्यांनी सामना गमावला.
१९७९ : इक्बालच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला त्यांनी हरवले, परंतु इंग्लंडकडून १४ धावांनी हार पत्करली. त्यामुळे गटउपविजेते म्हणून त्यांनी आगेकूच केली. परंतु विश्वविजेत्या विंडीजपुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव झाला.
१९८३ : साखळीत पाकिस्तानने तीन सामने जिंकले, तर तीन गमावले. गुणतालिकेत न्यूझीलंडसोबत समान १२ गुण झाले असतानाही सरस धावगतीच्या बळावर पाकिस्तानने बाद फेरी गाठली. इम्रान खान कर्णधार असलेल्या या संघाची उपांत्य फेरीत पुन्हा विंडीजशी गाठ पडली आणि ते पुन्हा पराभूत झाले. विंडीजविरुद्ध हा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला होता.
१९८७ : इम्रानने दिमाखात घोडदौड करताना साखळीतील सहा पैकी पाच सामने जिंकत गटविजेत्याचा मान संपादन केला. त्यांचा एकमेव पराभव हा विंडीजविरुद्ध होता, परंतु साखळीत पाकिस्तानने एकदा त्यांना हरवलेसुद्धा होते. मग सलग तिसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानची वाटचाल संपुष्टात आली. यावेळी लाहोर येथे ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
१९९२ : या विश्वचषकात प्रथमच रंगीत गणवेश, पांढरा चेंडू आणि प्रकाशझोत अशी क्रांती झाली होती. पण यावेळी मात्र पााकिस्तानने साखळीत सामान्य कामगिरी करून मग विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवला. कर्णधार इम्रानच्या संघाची सुरुवातीची कामगिरी पाहता त्यांच्याकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या. पाकिस्तानला विंडीजने १० गडी राखून हरवले, मग परंपरागत प्रतिस्पर्धी भारताने त्यांना हरवले. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा डाव ७४ धावांत कोसळला होता, परंतु पावसामुळे एक गुण पाकिस्तानच्या पदरी पडला. अखेरच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाने विंडीजचा धक्कादायक पराभव केला आणि पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले. त्यानंतर मात्र जिद्दीने खेळत पाकिस्तानी संघाने मागे वळून पाहिलेच नाही. इन्झमाम उल हकने ३७ चेंडूंत साकारलेल्या ६० धावांच्या खेळीने पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले. मग वसिम अक्रमच्या सामन्याचा निकाल पालटवणाऱ्या गोलंदाजीमुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला नामोहरम केले आणि चाळीशीच्या इम्रानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले.
१९९६ : वसिम अक्रमच्या नेतृत्वाखाली साखळीतील पाच पैकी चार सामने जिंकत पाकिस्तानी संघ बाद फेरीत पोहोचला. फक्त बलाढय़ द. आफ्रिकेविरुद्ध ते अपयशी ठरले. परंतु गतविजेत्या पाकिस्तानला यावेळी उपांत्यपूर्व फेरीत भारताने हरवले. आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी चांगली सलामी दिल्यानंतरसुद्धा हा सामना पाकिस्तान वाचवू शकला नाही. अक्रमला दुखापत झाल्यामुळे सोहेलने संघाचे नेतृत्व केले होते. जावेद मियाँदादने या सामन्यात ६४ चेंडूंत ३८ धावा केल्या. १९७५च्या विश्वचषकात पदार्पण केलेल्या जावेदने विश्वचषकाच्याच सामन्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला.
१९९९ : १६ वर्षांनी विश्वचषक स्पर्धा इंग्लिश भूमीत परतली आणि पकिस्तानने अंतिम फेरीत पोहोचण्याची किमया साधली. साखळीत पदार्पणवीर बांगलादेशविरुद्ध पत्करलेला अविश्वसनीय पराभव वगळल्यास पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया, विंडीजसारख्या कडव्या प्रतिस्पध्र्याना पराभूत केले. सुपर सिक्समध्ये ते भारताकडून हरले, परंतु तरीही उपांत्य फेरी पोहोचून न्यूझीलंडला नऊ विकेट राखून पराभूत केले. मग अंतिम सामन्यात मात्र अक्रमचा संघ फक्त १३२ धावांत भुईसपाट झाला आणि विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. विश्वविजेतेपदाच्या लढतीतील ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
२००३ : हा विश्वचषक पाकिस्तानसाठी निराशाजनक ठरला. वकार युनूसच्या संघाला गटात दुबळ्या हॉलंड आणि नाम्बियापेक्षा वरचे पाचवे स्थान मिळाले. इन्झमाम उल हकला सहा सामन्यांत जेमतेम १९ धावा करता आल्या आणि भारताविरुद्ध विश्वचषकातील तिसऱ्या पराभवामुळे तर या जखमेवर तीव्र आघात झाला. पाकिस्तानने फक्त दोन सामने जिंकले, तर तीन गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला.
२०११ : सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला सहयजमानपदाला मुकावे लागले. परंतु श्रीलंकेत पाकिस्तानने आपल्या अभियानाला चांगला प्रारंभ केला. गटसाखळीत पाच विजय आणि न्यूझीलंडविरुद्ध एक पराभव अशा कामगिरीसह पाकिस्तानचा संघ बाद फेरीत पोहोचला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानने विंडीजला १० गडी राखून पराभूत केले आणि एका तपानंतर उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. परंतु भारताचा अडथळा ओलांडण्यात पाकिस्तानचा संघ पुन्हा अपयशी ठरला. मोहालीत झालेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ २९ धावांनी पराभूत झाला. मग १९७९, १९८३ आणि १९८७ची पुनरावृत्ती झाली आणि पाकिस्तानला उपांत्य फेरीत हरवणारा संघ विश्वविजेता झाला.
२०१५ : साखळीत ब-गटात समावेश असलेल्या पाकिस्तानने सहापैकी चार सामने जिंकले. त्यांना भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मग उपांत्यपूर्व फेरीत जोश हॅझलवूडच्या माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ २१३ धावांत गारद झाला. मग ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवत जगज्जेतेपदाकडे वाटचाल केली. शाहीद आफ्रिदी, युनूस खान आणि मिसबाह उल हक यांचा हा कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरला.
२००७ : ही विश्वचषक स्पर्धासुद्धा पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी अपयशी ठरली. यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध पत्करलेल्या पहिल्या पराभवातून पाकिस्तानी संघ अखेपर्यंत सावरला नाही. पावसाचा फटका बसलेल्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यातही ते पराभूत झाले. इन्झमामच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव विजय मिळवू शकला आणि साखळीतच ते गारद झाले. आर्यलडविरुद्धच्या आश्चर्यकारक पराभवानंतर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा गूढ मृत्यू झाल्यामुळे क्रिकेटविश्व ढवळून निघाले.
पाकिस्तान
क्रमवारीतील स्थान : ६
सहभाग : १९७५ ते २०१९ (सर्व)
कामगिरी : सामने ७१, विजय ४०, पराभव २९, टाय ०, रद्द २, यशाची टक्केवारी ५७.९७ %
विजेतेपद : १९९२
उपविजेतेपद : १९९९
संघ : पाकिस्तानचा संघ : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम, हॅरिस सोहेल, आसिफ अली, शोएब मलिक, मोहम्मद हाफीज, इमाद वसीम, शदाब खान, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हसनैन.
प्रशिक्षक : मिकी आर्थर.
साखळीतील सामने
३१ मे – वि. वेस्ट इंडिज
३ जून – वि. इंग्लंड
७ जून – वि. श्रीलंका
१२ जून – वि. ऑस्ट्रेलिया
१६ जून – वि. भारत
२३ जून – वि. द. आफ्रिका
’२६ जून -वि. न्यूझीलंड
२९ जून – वि. अफगाणिस्तान
५ जुलै – वि. बांगलादेश.
संकलन : प्रशांत केणी