रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या स्पेनच्या कट्टर प्रतिस्पर्धी क्लबमध्ये मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही चढाओढ पाहायला मिळते. ब्राझिलच्या १७ वर्षीय व्हिनिशियस ज्युनियरला विक्रमी किमतीत करारबद्ध करणाऱ्या रिअल माद्रिदने पुढील मोर्चा वळवला तो जपानच्या टाकेफुसा कुबोकडे.. बार्सिलोना अकादमीत फुटबॉलचे धडे गिरवलेल्या या खेळाडूने अप्रतिम खेळाच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. थायलंड, इराण आणि दक्षिण कोरिया या आशियाई संघांमध्ये त्यांचे त्यांचे मेस्सी आहेत आणि यात आता जपानचाही समावेश झाला आहे. उंचीने लहान, परंतु चपळ.. प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवण्याची कला अन् ३० यार्डावरून गोलजाळीचा अचूक वेध घेण्याचे कौशल्य, यामुळे या १५ वर्षीय खेळाडूने ‘जपानचा मेस्सी’ अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
कुबोने एफसी टोकियो क्लबच्या वरिष्ठ संघात पदार्पण करून सर्वाचे लक्ष वेधले. जे-लीगच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याहीपेक्षा भारतात होणारी कुमार स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील दुसरी विश्वचषक स्पर्धा असणार आहे. दक्षिण कोरियात झालेल्या २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठीच्या जपानच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला होता आणि पुढील महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘कुमार विश्वचषक स्पर्धेतील संघात स्थान मिळवण्याची तयारी करत असताना २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल, असे स्वप्नही पाहिले नव्हते. उंची कमी असली तरी त्या मोबदल्यात मला चपळाईचे वरदान मिळाले आहे. त्या जोरावर विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल,’ असा निर्धार कुबोने भारतात दाखल होण्यापूर्वी व्यक्त केला आहे. यूटय़ूबवरही कुबोच्या फॉलोअर्सची संख्या लाखांच्या घरात आहे. त्याचा आणि मेस्सीचा खेळ एकाच वेळी पाहणाऱ्यांनाही या दोघांमधील फरक त्वरित ओळखता येणार नाही. बार्सिलोना क्लबसोबत जोडला गेल्यानंतर कुबो प्रसिद्धीझोतात आला. पर्सीमन या स्थानिक फुटबॉल क्लबकडून खेळताना कुबोने सर्वाना मंत्रमुग्ध केले. २०११ मध्ये त्याने बार्सिलोनाच्या युवा अकादमीत प्रवेश मिळवला. ११ वर्षांखालील स्पर्धेत त्याने ३० सामन्यांत ७४ गोल्सचा पाऊस पाडला. तसेच १२ वर्षांखालील मेडीटरनीन चषक स्पर्धेचे जेतेपदही पटकावून दिले. त्याने आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करताना राष्ट्रीय संघात स्थान पटकावले. एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करताना जपानला भारतात होणाऱ्या कुमार विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवून दिली.