राष्ट्रीय स्तरावर कुस्ती लीग झाल्यावर आता राज्य स्तरावरही याचा आनंद कुस्तीशौकिनांना उपभोगता येणार आहे. महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन्स लीग मार्च महिन्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या लीगला हिरवा कंदील दाखवला आहे. स्थानिक, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहून या स्पर्धेच्या तारखा ठरवण्यात येणार आहेत.
‘‘लिलावासाठी आतापर्यंत जवळपास १२०० कुस्तीपटूंची यादी तयार करण्यात आली आहे. या १२०० कुस्तीपटूंमधून ५०० खेळाडूंना निवडण्यात येईल आणि या खेळाडूंना लिलावाद्वारे मालक आपली संघबांधणी करतील. महाराष्ट्रामध्ये पुण्यातील बालेवाडीमध्ये सर्व लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत,’’ असे महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन्स लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कराज केळकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आताच्या घडीला काही असे कुस्तीपटू आहेत की ज्यांनी चांगली कामगिरी करूनही त्यांना ओळख मिळालेली नाही. काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली आहेत, पण ‘महाराष्ट्र केसरी’पुढे त्यांना नावलौकिक मिळत नाही. या उपेक्षित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी या लीगची स्थापना करण्यात आली आहे.’’
लीगची आखणी
या लीगमध्ये सहा वजनी गट असतील. यामध्ये चार पुरुषांचे आणि दोन महिलांचे गट असतील. प्रत्येक वजनी गटात तीन कुस्तीपटू असतील. त्यानुसार एका संघात १८ कुस्तीपटू खेळतील, यामध्ये १२ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश असेल.
सहा संघ
या लीगमध्ये सहा संघ असतील. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा समावेश असेल. एखादी व्यक्ती फ्रेंचायझी विकत घेईल आणि त्यानंतर खेळाडूंसाठीचा लिलाव केला केला जाईल. प्रत्येक संघाबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नामांकित व्यक्ती शुभंकर असेल.