‘‘माझ्या प्रत्येक पदकामागे एक वेगळा संघर्ष आहे,’’ हे एमसी मेरी कोमचे वाक्य किती बोलके आहे, याची प्रचीती तिच्या जीवनातील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर नजर टाकताना येतेच. एक मुलगी म्हणून बॉक्सिंग खेळण्यावर वडिलांनी घातलेली बंदी, बॉक्सिंगपटू बनण्याच्या तिच्या स्वप्नांची समाजाकडून उडवली जाणारी थट्टा, सरकारी व्यवस्थेकडून होणारी आडकाठी, लग्नानंतर आलेली मातृत्वाची जबाबदारी, असे अनेक प्रसंग तिच्या आयुष्यात घडले. पण या अशा सगळ्या प्रसंगांना ‘पंचिंग बॅग’प्रमाणे ठोसे लगावून ती पुढे चालत राहिली. आशियाई स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरीची रिंगमधील वाटचाल वयाच्या ३४ व्या वर्षीही ऐन बहरात आहे.
व्हिएतनाम येथे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत मेरीने सुवर्णपदक पटकावले आणि सारा देश मेरीचे कौतुक करू लागला. पण काही महिन्यांपूर्वी तिने केलेले पुनरागमन निराशाजनक होते. उलानबातर बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात तिला हार पत्करावी लागली. उपांत्यपूर्व फेरीच्या त्या लढतीत मेरीला तिच्याहून उंच प्रतिस्पध्र्याला ठोसा लगावताच येत नव्हता. १७ वर्षांच्या कारकिर्दीत मेरी कोमबाबत असे क्वचितच घडले होते. प्रतिस्पर्धी कितीही ताकदवान असो, मेरीच्या आक्रमक आणि जलद ठोशासमोर तो टिकणे अवघडच. पण तिशीपल्याड मेरीच्या तंदुरुस्तीने यावेळी तिच्या आक्रमणाची धार बोथट केली. तिच्या कारकीर्दीचा शेवट असा कुणालाही अपेक्षित नाही. पण परिस्थितीने तिला मानसिकदृष्टय़ा कणखर बनवले, परंतु वाढत्या वयाबरोबर तंदुरुस्तीचे नवे आव्हान तिच्यासमोर उभे ठाकले होतेच. संघर्षांची शिदोरी कायम पाठीवर असलेली मेरी या पराभवाने खचणारी नव्हती.
आशियाई आणि पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून तिने ५१ ऐवजी ४८ किलो वजनी गटासाठी तयारी सुरू केली. आठ तास सराव, खाण्याचे पथ्य, खासदार असल्याने सामाजिक जबाबदाऱ्या आणि अकादमीची जबाबदारी हे सर्व सांभाळून तिने मोठय़ा जिद्दीने पुन्हा पुनरागमन केले. आशियाई स्पर्धा सुरू झाल्यापासून तिच्या नावाची फार कुणी चर्चाही करत नव्हते. स्पर्धेचा तो पहिला दिवस आणि समारोपाचा दिवस या प्रवासात मेरीने पुन्हा एकदा सर्वाना दखल घेण्यास भाग पाडले. ‘‘इतर पदकांप्रमाणे आशियाई स्पर्धेतील हे पदक महत्त्वाचे आहे. मी हे पदक जिंकू शकले, कारण यामागेही एक संघर्षकथा आहे,’’ असे मेरी सांगते. खासदारकी मिळाल्यानंतर मेरीवरील जबाबदारी अधिक वाढली.
तीन मुलांना सांभाळण्याची जबाबदारीही ती योग्य रीतीने पार पाडते. ती खऱ्या अर्थाने ‘सुपरमॉम’ आहे. स्वत:च्या शारीरिक क्षमतेची असलेली जाण, हे तिचे वैशिष्टय़. विश्रांती घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला झेपेल इतकाच सराव किंवा ताण ती शरीराला देते. कुठे थांबायचे याची योग्य जाण तिला आहे. त्यामुळेच कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून ती सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक हे तिच्या संघर्षांला मिळालेली दाद आहे आणि या संघर्षांत एक महत्त्वाची व्यक्ती तिच्या सोबत नेहमी उभी राहिली. ती म्हणजे तिचा पती ओनरेल. आशियाई स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक पटकावत तिने आपल्या कर्तृत्वाची प्रचीती पुन्हा घडवली. ३४ व्या वर्षी, १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द, ऑलिम्पिक, सहा जागतिक पदके आणि अनेक आशियाई जेतेपदे तरीही मेरीची जिंकण्याची भूक अजून संपलेली नाही. अशा या दृढनिश्चयी मेरी कोमकडून अपेक्षा अजून उंचावल्या आहेत आणि त्या उंचावत राहतील.
तंदुरुस्तीचे रहस्य
- सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत मिळून आठ तास सराव.
- प्रथिने, जीवनसत्त्वे, काबरेहायड्रेट यांचे योग्य प्रमाण मिळेल असा आहार.
- नियमित आणि ठरलेल्या वेळेत जेवण.
- रोज १४ किलोमीटर धावणे, दोरीउडय़ा, व्यायाम.
- पंचिग बॅग आणि स्पीड बॅग यांच्यावर ठोसे मारण्याचा सराव.
- अकादमीतील खेळाडूंशी किंवा प्रशिक्षकांसोबत सराव सत्र.
- दुपारच्या वेळेत व्यायामशाळेत शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने पुशअप व सिट अपचा सराव.
- सायंकाळच्या सत्रात पुन्हा सकाळच्या सरावाची पुनरावृत्ती.
– स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com