भारताचा पराभव. प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज. वर्ष २०१६. वानखेडेवर झालेला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतरचा किस्सा. एका परदेशी पत्रकाराने महेंद्रसिंग धोनीला निवृत्तीबाबत विचारले. तो म्हणाला, ‘‘आतापर्यंत बऱ्याच गोष्टी तू कमावल्या आहेस, यापुढेही क्रिकेट खेळण्याचा तुझा विचार आहे का?’’ धोनी म्हणजे कॅप्टन कूल. पण त्या वेळी धोनी सारे भान विसरलेला. त्याने त्या परदेशी पत्रकाराला स्वत:जवळ बोलावले. जगभरात त्याचे चित्रीकरण होणार, हे बहुतेक धोनी विसरला असावा. ‘‘मी तंदुरुस्त नाही? मी धावा काढताना चपळाईने धावत नाही का? मग मला असा प्रश्न का विचारता,’’ असे धोनी म्हणाला. शक्यतो धोनी अशा प्रश्नांना यापूर्वी फक्त एक स्मित देऊन शांत करायचा. २०१४ पासून धोनीला निवृत्तीबाबत विचारणा करायला सुरुवात झाली. धोनी जायबंदी असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केली. तेव्हापासून निवृत्तीचा प्रश्न धोनीच्या पाचवीला पुजलेलाच.
ऑस्ट्रेलियातील २०१५ सालचा विश्वचषक. भारताचा उपांत्य फेरीत पराभव. पत्रकार परिषदेमध्ये धोनीला पहिला प्रश्न निवृत्तीचाच. धोनीसाठीही हे अनपेक्षित असेल. या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही पहिला प्रश्न धोनीला निवृत्तीचा. सारे काही निवृत्तीवर येऊन ठेपलेले.
‘‘मी म्हणजे मंदिरातील घंटा आहे, प्रत्येक जण येतो आणि वाजवून जातो. मी निवृत्तीच्या प्रश्नावर काही बोललो नाही तर वादाला तोंड फुटणार. आणि जर समर्पक उत्तर दिले तरी वादविवाद ठरलेले,’’ असे धोनीने आपला मित्र आणि व्यवस्थापक अरुण पांडेला सांगितले होते.
तुम्ही जेवढय़ा वेगाने यशाच्या लाटेवर स्वार होता, तेवढय़ाच वेगाने तुमची वाईट कामगिरीही लोकांच्या नजरेत भरते. धोनीचे हे असेच झाल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीला धोनी म्हणजे ‘मिडास राजा’ वाटायचा. तो जिथे हात लावेल तिथे सोने व्हायचे. अनपेक्षित रणनीती हे त्याचे वैशिष्टय़. ‘अनहोनी को होनी कर दें, धोनी,’ अशी गीते कानावर पडायला लागली होती. एका बाजूला संघात असलेल्या वरिष्ठ खेळाडूंना जे जमत नव्हते ते धोनी आपल्या पोतडीतून बाहेर काढून दाखवत होता. २००७ मध्ये त्याने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर २०११ साली वानखेडेवर इतिहास लिहिला गेला. चॅम्पियन्स करंडक म्हणू नका की कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान. सर्व ठिकाणी धोनीचे संस्थान होते. काही गोष्टी आठवून पाहा. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला आपला अखेरचा सामना घरच्या मैदानावर खेळायचा होता. त्यासाठी तो धोनीशी संपर्क साधत होता, पण धोनीने त्याला लांबच ठेवले. राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजाला मैदानाबाहेर निवृत्तीची घोषणा करावी लागली. वीरेंद्र सेहवाग कधी निवृत्त झाला, आठवतेय का? अनिल कुंबळेने अचानक निवृत्तीचा निर्णय कसा घेतला आणि धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ कशी पडली? गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग यांचे भवितव्य काय? या साऱ्या गोष्टी सांगण्याची खरेच गरज आहे का? तर, होय. कारण या साऱ्या गोष्टींचा अन्वयार्थ लागला तरच धोनीच्या निवृत्तीबाबतचे चर्वितचर्वण समजता येऊ शकेल. सुज्ञांस न सांगणे बरे.
धोनी म्हणजे जगातला सर्वोत्तम विजयवीर (फिनिशर). हे काही वर्षांत ऐकायला आलेले नाही. धोनीकडून फार मोठय़ा अपेक्षा आहेत. त्या कराव्या किंवा करू नयेत, हा वादाचा मुद्दा. पण त्याच्याकडून आहेत. अशीच एखादी पूर्वीसारखी खेळी खेळावी, संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब आपल्या बॅटच्या धावांमधून व्हावे, असे धोनीला वाटत नसणार का? पण ते त्याच्याकडून होत नाही. द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग आणि सचिन यांच्याबाबतही असेच झाले होते. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे काही व्यक्ती म्हणतात. तसेच या खेळाडूंच्या बाबतीतही झाले, ते कुणी केले हे न सांगणे बरे. तसेच काहीसे धोनीच्या बाबतीतही होत असेलही. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असू शकतात?
काही दिवसांपूर्वी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीला पर्याय शोधावा लागेल असे म्हटले होते. प्रसाद यांच्या वक्तव्यावर बऱ्याच जणांनी तोंडसुख घेतले होते. कारण प्रसाद यांचे कर्तृत्व काय आणि त्यांना बीसीसीआयने कुठे बसवले, सारेच अनाकलनीय. प्रसाद यांनी किती सामने खेळले आहेत आणि ते धोनीला असे कसे म्हणू शकतात? हा मुद्दा बऱ्याच जणांनी उचलून धरला. त्या वेळी तो चुकीचा नव्हताही. पण त्यानंतर सेहवाग, लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनीही हाच निवृत्तीचा मुद्दा मांडला. त्या वेळी मात्र प्रसाद यांच्यावर जसे शाब्दिक हल्ले झाले तसे या तिघांवर झाले नाहीत. कारण त्यांनी खेळलेले आंतरराष्ट्रीय सामने. धोनीची निवृत्ती आणि गुजरातमधल्या निवडणुका, हेच दोन मुद्दे सध्या देशासाठी महत्त्वाचे असल्याचे दिसत आहेत.
धोनीचे वय जास्त झाले आहे का, तर नाही. सध्या ३६ वर्षे त्याची पूर्ण झाली आहेत. रोहन कन्हाय वेस्ट इंडिजसाठी ४० व्या वर्षी खेळले होते. इम्रान खानने विश्वचषक पटकावला तेव्हा तो ३९ वर्षांचा होता. २०११ च्या विश्वचषकात सचिनच्या नावावर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा होत्या, तेव्हा त्याचे वय होते ३८. त्यामुळे वयाचा प्रश्न महत्त्वाचा नाही. धोनी तंदुरुस्त आहे. तो धावा काढताना चपळाईने पळतोही. पण गेल्या काही वर्षांत त्याच्याकडून स्मरणात राहील अशी खेळी पाहायला मिळालेली नाही. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात युवा रोहित शर्माला संधी मिळावी म्हणून सेहवागसारख्या खेळाडूला बसवले होते. आता युवा यष्टिरक्षक- फलंदाज रांगेत उभे आहेत. त्यामुळे धोनीऐवजी या युवा खेळाडूंना संधी का मिळू नये, हा प्रश्न योग्यच. या साऱ्या प्रकरणात कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीच्या बाजूने बोलत आहेत. यामुळे बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसे या दोघांच्या मनात नक्की आहे का? साराच संशयकल्लोळ.
हे क्रिकेट आहे, इथे बळी पडायचेच. मैदानात आणि मैदानाबाहेरही. आणि ते काही क्रिकेटविश्वाला नवीन नाही. काळ बदलला तसे ‘बळी’ घेण्याचे प्रकारही बदलले. धोनी २०१९ चा विश्वचषक खेळतो का, याचे उत्तर सध्या कुणाकडे नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांची मूठ झाकलेली आहे. काळ हे काही प्रश्नांवर उत्तर असू शकते, असे म्हणतात. पण धोनीचा काळ कधी येईल, हे सांगता येत नाही.
प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com