राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना फायदा न होता स्पर्धेनिमित्त आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकारांनाच अधिक फायदा झाला आहे, अशा शब्दांत माजी ऑलिम्पिकपटू पी.टी. उषा यांनी स्पर्धा संयोजकांवर टीका केली आहे.
‘‘स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधांचाच येथे अभाव आहे. खरे तर ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील मिनी ऑलिम्पिक दर्जाची असते. त्या दृष्टीने सर्व सुविधा व क्रीडा संकुले अव्वल दर्जाची असण्याची आवश्यकता आहे, मात्र अद्याप अनेक क्रीडा संकुलांची कामे पूर्ण झालेली नाहीत. ही अतिशय शोकांतिका आहे,’’ असे उषा यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘संयोजकांनी उद्घाटन व समारोप सोहळ्यात सहभागी झालेल्या कलाकारांवर भरपूर पैसे उधळले आहेत. हे कार्यक्रम अधिकाधिक आकर्षक दिसावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र हे करताना त्यांनी खेळाडूंसारख्या महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष केले आहे.’’
‘‘ऑलिम्पिक स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने आयोजित केल्या जातात. केरळमध्ये मात्र विरोधाभास पाहायला मिळत आहे. या स्पर्धेद्वारे उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळत असते. त्या दृष्टीने येथील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक सर्वोत्तम असला पाहिजे. मात्र हा ट्रॅक अपेक्षेइतका चांगला झालेला नाही. अशा अनेक गोष्टींकडे संयोजकांनी दुर्लक्ष केलेले आहे,’’ असेही उषा यांनी सांगितले. 

Story img Loader