भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज आणि अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३९ वर्षीय मिताली एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होती. मिताली गेल्या २३ वर्षांपासून क्रिकेटशी निगडीत होती. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून मितालीने याबाबत माहिती दिली. याच पोस्ट मध्ये तिने आपण लवकरच नवीन गोष्टीला सुरुवात करणार अल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये याबद्दल चर्चा रंगली आहे.
मितालीने आपल्या आयुष्यातील २३ वर्षांचा काळ क्रिकेटसाठी दिला आहे. प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केल्यानंतर भविष्यात ती काय करणार आहे, याबद्दल तिने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र, निवृत्तीच्या पत्रामध्ये तिने लवकरच एका नवीन गोष्टीला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ती म्हणली, “हा प्रवास आता संपला आहे. पण, मी लवकरच काहीतरी नवीन सुरू करेल. कारण, मला माझ्या आवडत्या खेळात गुंतून राहायला आवडेल. भारत आणि जगभरातील महिला क्रिकेटच्या वाढीसाठी मला हातभार लावण्याची माझी इच्छा आहे.”
मितालीच्या या संकेताबाबत आता विविध तर्क लढवले जात आहेत. मिताली निवृत्तीनंतर प्रशिक्षणाची जबाबदारी घेणार का? तिने म्हटल्याप्रमाणे महिला क्रिकेटच्या वाढीसाठी ती कशा प्रकारे योगदान देणार? ती मुलींसाठी क्रिकेट अकादमी सुरू करणार का? असे कितीतरी प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले असतील. काहीजण तर तिच्या लग्नाबाबतही चर्चा करत आहेत. ३९ वर्षीय मितालीने लग्न केलेले नाही. त्यामुळे आता क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ती संसाराला लागणार का? असाही विचार काहींच्या मनात आला असण्याची शक्यता आहे.
मितालीची क्रिकेट कारकीर्द सर्वात गौरवपूर्ण कारकीर्दींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत भारतासाठी १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत.