गतविजेता स्पेनचा संघ मोठय़ा दिमाखात विश्वचषकासाठी दाखल झाला, पण पहिल्याच सामन्यात त्यांचा खुर्दा उडवत नेदरलँड्सने पराभवाचा सव्याज वचपा काढला. आता पराभवाची भळभळती जखम अंगावर घेऊन स्पेनचा संघ चिलीविरुद्धच्या ‘करो या मरो’ या सामन्यात जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा ‘झटकून टाक ती राख, नव्याने आग पेटू दे आज..’ अशीच अपेक्षा त्यांचे चाहते करीत असतील.
स्पेनचा संघ पहिल्याच सामन्यात १-५ अशा मोठय़ा फरकाने पराभूत होईल, असे अनपेक्षित घडले. कारण गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त झाली होती. पण या पराभवाने नक्कीच संघात भूकंप आला असेल. पण १९६६, २००२ आणि २०१०मध्ये गतविजेत्यांना पहिल्या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता व हेच आपल्या बाबतीतही होऊ शकते, याची भीती नक्कीच त्यांना असेल. पण पहिल्या मानहानीकारक पराभवानंतर स्पेनचा संघ पेटून उठेल, अशी अपेक्षा बऱ्याच जणांना आहे.
प्रशिक्षक व्हिसेंट डेल बॉस्के हे स्पेनच्या संघाचा कणा असल्याचे मानले जाते. कारण त्यांच्या रणनीतीच्या जोरावरच स्पेनने गेल्या वेळी विश्वचषक जिंकला होता. या वेळी संघात काही बदल करायचे त्यांनी ठरवले असले तरी ते मोठे बदल मात्र नक्कीच करणार नाहीत. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरण्याचे त्यांचे महत्त्वाचे काम असेल. त्यांच्याकडे डेव्हिड व्हिला, झाबी अलोन्सो, फर्नाडो टोरेससारखे नावाजलेले खेळाडू आहेत. त्यामुळे हे खेळाडू इरेला पेटले तर स्पेन काहीही करू शकते.
आतापर्यंत विश्वचषकातील चिलीविरुद्धचे दोन्ही सामने स्पेनने जिंकले आहेत. पण या वेळी चिलीचा संघही चांगल्या फॉर्मात असल्याचे म्हटले जात आहे. चिलीने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला असून त्यांचे मनोबलही उंचावलेले असेल.
हा सामना स्पेनने गमावला किंवा बरोबरीत सोडवला तर त्यांच्यावर विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात स्पेनने आतापर्यंत मिळवलेला लौकिक डावावर लागला असून त्यांच्याकडून जोरदार पुनरागमनाची अपेक्षा फुटबॉल जगताला असेल.

सामना क्र. १९
‘ब’ गट : स्पेन वि. चिली
स्थळ :  इस्टाडिओ माराकॅना, रिओ डे जानेरिओ ल्ल सामन्याची वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
लक्षवेधी खेळाडू
डेव्हिड व्हिला (स्पेन) : स्पेनच्या संघातील दर्जेदार आक्रमणपटू म्हणजे डेव्हिड व्हिला. आतापर्यंत व्हिलाने स्पेनसाठी खेळताना प्रतिस्पध्र्याना हतबल करून सोडले आहे. पण नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये व्हिलाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण शांत बसणारा व्हिला नक्की नाही. त्यामुळे चिलीविरुद्धच्या सामन्यामध्ये व्हिलाकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

अ‍ॅलेक्सी सांचेझ (चिली) : चिलीच्या संघातील सर्वोत्तम आघाडीपटू म्हणून अ‍ॅलेक्सी सांचेझचे नाव घेतले जाते. आतापर्यंत आक्रमक आणि चपळ खेळाच्या जोरावर त्याने चिलीसाठी दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने गोल करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे स्पेनविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून चिलीला जास्त अपेक्षा असेल.

व्यूहरचना
गोलपोस्ट
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये आम्हाला मोठा पराभव स्वीकारावा लागला असल्यामुळे बदल करावे लागतील. पण हे बदल मोठय़ा स्वरूपाचे नसतील. संघातील खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता असून कोणत्याही खेळाडूला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही. संघामध्ये २३ गुणवान खेळाडू आहेत, यामधून सर्वोत्तम रणनीती आखण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-व्हिसेंट डेल बोस्के, स्पेन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याला मैदानात उतरण्यापूर्वी मी स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यामधील सामना पाहिला. त्यांच्यामध्ये जिंकण्याची ईर्षां मला दिसली, पण या सामन्यात त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण त्यांचा संघ नेहमीच धोकादायक असला तरी बाद फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
– अटय़ूरो व्हिडाल, चिली

आमने-सामने
सामने : २
विजय : स्पेन २