६२४ धावांसह न्यूझीलंडला आघाडी
स्टीव्हन स्मिथ, अॅडम व्होग्सची शतके
कसोटी सामने रटाळ, एकसुरी होतात याचा प्रत्यय पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या खेळपट्टीने दिला. जगातील सगळ्यात वेगवान खेळपट्टी अशी या मैदानाची ख्याती होती. मात्र मैदानावरच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय लढतीत खेळपट्टी शुष्क आणि सपाट तयार करण्यात आली आणि प्रत्येक दिवशी शतकोत्सव रंगला. चौथ्या दिवशी शतक पर्वाला आणखी बहर आला. २९० धावांच्या विक्रमी खेळीसह रॉस टेलरने नवनव्या विक्रमांची नोंद केली. या खेळीच्या बळावरच न्यूझीलंडने ६२४ धावांसह ६५ धावांची आघाडी मिळवली. मात्र स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम व्होग्स या दोघांच्या शतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा आघाडी मिळवली आहे.
चौथ्या दिवशी ६ बाद ५१० वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडने ११४ धावांची भर घातली. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही रॉस टेलरने संयमी खेळ करीत मॅरेथॉन खेळी साकारली. ऑस्ट्रेलियात विदेशी फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा ११२ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडत रॉसने इतिहास घडवला. त्याने ५६७ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत ४३ चौकारांसह २९० धावांची खेळी केली. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने टेलरने त्रिशतकाचे स्वप्न भंगले. टेलरच्या खेळीच्या आधारेच न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येला मागे टाकत आघाडी मिळवली. ६२४ धावांचा डोंगर उभारत ऑस्ट्रेलियाने ६५ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. टीम साऊदीने जो बर्न्सला भोपळाही फोडू दिला नाही. पहिल्या डावातील द्विशतकवीर डेव्हिड वॉर्नर २४ धावा करून तंबूत परतला. २ बाद ४६ अशा स्थितीमुळे न्यूझीलंडला सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. मात्र कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम व्होग्स या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी रचत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. बोल्टच्या गोलंदाजीवर चौकार खेचत स्मिथने कर्णधार म्हणून पाचव्या कसोटीत चौथ्या शतकाची नोंद केली. स्मिथच्या कारकीर्दीतील हे बारावे शतक आहे. विल्यमसनच्या गोलंदाजीवर चौकार लगावत व्होग्सने कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावा झाल्या आहेत. स्मिथ १३१, तर व्होग्स १०१ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे १९३ धावांची आघाडी आहे.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) ५५९ आणि (दुसरा डाव) २ बाद २५८ (स्टीव्हन स्मिथ खेळत आहे १३१, अॅडम व्होग्स १०१) विरुद्ध न्यूझीलंड (पहिला डाव) ६२४ (रॉस टेलर २९०, केन विल्यमसन १६६).
शतकोत्सव सुरूच ; रॉस टेलरची २९० धावांची मॅरेथॉन खेळी
चौथ्या दिवशी ६ बाद ५१० वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडने ११४ धावांची भर घातली.
First published on: 17-11-2015 at 00:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As it happened australia vs new zealand 2nd test day