WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात आर अश्विनने तीन विकेट्स घेतल्यास तो मोठी कामगिरी करेल. तो हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेच्या एका खास क्लबमध्ये सामील होईल.
अश्विन हरभजन आणि कुंबळेच्या क्लबमध्ये होणार सामील –
टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ३ विकेट घेतल्यास, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण करेल. आतापर्यंत केवळ अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनाच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक बळी घेता आले आहेत. अशा परिस्थितीत तो एका खास क्लबमध्ये आपले स्थान निश्चित करेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
१. अनिल कुंबळे – ९५६ विकेट्स
२. हरभजन सिंग – ७११ विकेट्स
३. रविचंद्रन अश्विन – ६९७ विकेट्स
४. कपिल देव – ६८७ विकेट्स
हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी कोहलीबाबत स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन लायनच मोठं वक्तव्य; म्हणाले, “विराट…”
रविचंद्रन अश्विनची कारकीर्द –
रविचंद्रन अश्विन हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अश्विनने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत ९२ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २३.९३ च्या सरासरीने ४७४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या फिरकीपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्येही ११३ सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये या कॅरम बॉल स्पेशालिस्टने ६५ सामन्यात ७२ विकेट घेतल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.