वादग्रस्त पाकिस्तानी पंच असद रौफ याच्याभोवती चौकशीचा फास आवळण्याची शक्यता आहे. सट्टेबाज पवन जयपूर याने असद रौफ याला एक मोबाइल सीम कार्ड दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते हे सीम कार्ड वापरत होता. जेव्हा जेव्हा तो भारतात यायचा तेव्हा तेव्हा तो या सीम कार्डचा वापर करायचा. सट्टेबाजांशी संपर्क साधण्यासाठी तो या सीम कार्डचा वापर करायचा. मुंबई पोलिसांनी आणि दिल्ली पोलिसांनी खेळाडू आणि सट्टेबाजांचे अटकसत्र सुरू केले तेव्हा विंदूने रौफला हे सीम कार्ड नष्ट करायला सांगितले. १६ मे रोजी विंदूने सावधगिरीचा उपाय म्हणून हे सीम कार्ड नष्ट करायला सांगितले होते, तर २१ मे रोजी रौफ दुबईमार्गे पाकिस्तानला फरार झाला. रौफ हा सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्याला ताब्यात घेण्याबाबत पोलिसांचा विचार सुरू असून त्याल अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सट्टेबाज टिंकूचा ताबा मुंबई पोलिसांकडे
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला सट्टेबाज टिंकू ऊर्फ अश्विन अगरवाल याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला असून त्याच्या चौकशीतून अनेक महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. अश्विन या सट्टेबाजी प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आहे. मंगळवारी दिल्लीतील त्याची पोलीस कोठडी संपली. मुंबई पोलिसांनी दिल्लीत जाऊन चौकशीसाठी त्याचा ताबा मागितला. न्यायालयाने टिंकूचा ‘ट्रान्झिट रिमांड’ मुंबई पोलिसांकडे दिला आहे. त्याला आता मुंबईत आणून रितसर पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. त्याच्या चौकशीनंतरच अनेक पैलूंवर प्रकाश पडेल, असे पोलिसांनी सांगितले.

विंदूच्या डायरीतील सांकेतिक भाषा..
विंदूला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडून लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल आणि एक डायरी जप्त केली. या डायरीत त्याने सांकेतिक भाषेत सट्टेबाजीचे व्यवहार आणि हिशेब लिहून ठेवला होता. त्याच्या डायरीत खालीलप्रमाणे सांकेतिक भाषेत लिहिले होते.
गुरू टू जॅक- ५ लगाया ३ खाया
शंतू टू जॅक- २ गया
रमेश भाई- १ आया
पीडी- झीरो
म्हणजे गुरुनाथ मय्यपनने जॅक अर्थात विंदूला ५ लाख रुपये सट्टा लावण्यासाठी दिले होते. त्यात गुरूनाथ ३ लाख रुपये हरला होता. शंतू नावाच्या सट्टेबाजाकडून विंदूला २ लाख रुपये मिळाले तर रमेश नावाच्या सट्टेबाजाचे १ लाख रुपये आले असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या डायरीत सट्टेबाज पवन जयपूरचे नाव पीजी भाई, एसजे दिल्लीवाले बाबा म्हणजे सट्टेबाज संजय जयपूर असा आहे. सट्टेबाजीमधल्या पैशांचा व्यवहार करणाऱ्या हवाला ऑपरेटरचे नाव विंदूने डायरीत चिडिया असे लिहिले होते. विंदूने हीच माहिती लॅपटॉप आणि आयपॅडमध्येही लिहिली होती. पण त्याने ती आधीच नष्ट केली होती. पोलिसांनी विंदूला बोलता केल्यानंतर त्याने या सांकेतिक भाषेचे अर्थ समजावून सांगितले.

अंडरवर्ल्ड संबंधांची चौकशी होणार
सट्टेबाज हे दुबई आणि पाकिस्तानच्या सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. दुबई आणि पाकिस्तानमधील सट्टेबाजी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचते. त्याच्याशिवाय हे शक्य नसल्याचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले. त्यामुळे सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करताना अडरवर्ल्डच्या संबंधांचीही चौकशी होणार असल्याचे रॉय यांनी सांगितले.

विंदूच्या कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ
आयीपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता विंदू दारां सिग रंधवा याच्यासह सट्टेबाज प्रेम तनेजा आणि सट्टेबाजीच्या पैशांचे व्यवहार सांभाळणारा अल्पेश पटेल यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली होती. दुपारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या तिघांच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विंदूला फसवल्याचा पत्नीचा आरोप
विंदूची रशियन पत्नी दररोज मुंबई गुन्हे शाखेत त्याला भेटायला येते. मंगळवारी त्याला पोलीस कोठडी मिळणार नाही असे तिला वाटले. पण जेव्हा त्याची पोलीस कोठडी ३१ मेपर्यंत वाढवली तेव्हा तिचा संताप अनावर झाला. विंदूने सट्टेबाजी करत असल्याचे कबूल केले आहे. मग त्याला पुन्हा पोलीस कोठडी का वाढविली, असा सवाल करत विंदूला पोलीस फसवत असल्याचा आरोप तिने केला.

आणि गुरूच्या आईला रडू कोसळले..
एरवी वातानुकूलित प्रासादात आणि ऐषारामात राहणाऱ्या अब्जाधीश गुरुनाथ मय्यपनला सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत राहावे लागत आहे. मंगळवारी त्याची आई ललिता आणि पत्नी रुपा त्याला भेटायाला चेन्नईहून आले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना फक्त दहा मिनिटे भेटायची परवानगी दिली. जेव्हा मुलाला कोठडीत पाहिले तेव्हा आई ललिता यांना अक्षरश: रडू कोसळले.  तर पत्नी रुपालाही गहिवरून आले. विंदूच्या नादी लागून मी १ कोटी रुपये हरलो. पण त्याचे मला दु:ख नाही. माझ्या कुटुंबियांची आणि माझ्या कंपनीची न भरून निघणारी बदनामी झाल्याचे गुरुनाथने पोलिसांना सांगितले. गुरुनाथच्या एव्हीएम या प्रख्यात कंपनीने ‘शिवाजी द बॉस’ हा चित्रपट सुपरस्टार रजनीकांतला घेऊन बनविला होता. रजनीकांतला त्यासाठी २५ कोटी रुपये दिले होते.

व्हिक्टरची महिनाअखेरीस चौकशी
सट्टेबाजीच्या चौकशीत विक्रम अग्रवाल उर्फ व्हिक्टर याचे नाव समोर आले आहे. व्हिक्टर हा गुरुनाथ मय्यपनचा मित्र असला तरी तो विंदू आणि सट्टेबाजांना ओळखत होता. त्याची भुमिका संशयास्पद असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स पाठवून बोलविण्याचा निर्णय घेतला होता. पण चेन्नई पोलिसांनी सुद्धा व्हिक्टरला ३० मे रोजी चौकशीसाठी बोलावले असल्याने त्याच्या नंतरच त्याला मुंबईत चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

Story img Loader