आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले पाकिस्तानचे वादग्रस्त पंच असद रौफ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमध्ये येण्यास नकार दिला आहे. हा नकार देताना त्यांनी आपला मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.
‘‘भारतीय न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही. त्यामुळे सध्याच्या घडामोडींमुळे मला भारतात येणे जमणार नाही. मात्र मी माझ्या वकिलांचा सल्ला घेतला आहे. त्यानुसार आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाला पूर्ण चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करेन,’’ असे रौफ यांनी सांगितले.
आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने रौफ यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. या प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रौफ यांची चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पंचांच्या पॅनेलमधून हकालपट्टी केली. त्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये रौफ यांना आयसीसीने कायम ठवले नाही.