टी २० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाची कामगिरी चांगली आहे. स्कॉटलँड आणि नामिबिया संघांना मोठ्या धावसंख्येनं पराभूत केल्यानं गुणतालिकेत ४ गुणांसह धावगती चांगली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. मात्र स्पर्धा सुरु असतानाच कर्णधार असगर अफगाणने निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता त्याच्या जागेवर संघात शराफुद्दीन अशरफ याला स्थान देण्यात आलं आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने त्याच्या सहभागास हिरवा कंदील दाखवला आहे.

२६ वर्षीय अशरफने ९ टी २० सहित २६ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. करोना संकटामुळे राखीव खेळाडू म्हणून अशरफ संघासोबतच आहे. त्यामुळे मुख्य संघात सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अष्टपैलू अशरफने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच गडी बाद केले आहेत. २०१५ मध्ये नेदरलँड विरुद्धच्या डेब्यू सामन्यात ३ गडी बाद केले होते. तर शेवटचा सामना अबूधाबीत झिम्बाब्वे विरूद्ध खेळला होता. जर मुजीब उर रहमान दुखापतीतून सावरला नाही, तर अशरफला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

३३ वर्षीय असगर अफगाणने ६ कसोटी, ११४ एकदिवसीय सामने खेळले. त्याने ७५ टी-२० सामन्यांमध्येही प्रतिनिधित्व केले आहे. सर्व प्रकारात त्याने ४२१५ धावा केल्या आहेत. त्याने ११५ सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आहे. २०१८ मध्ये भारताविरुद्ध पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो पहिला कसोटी कप्तान होता. त्याने कसोटी संघाचे नेतृत्व करत असताना दोन विजय आणि दोन पराभव पत्करले. कर्णधार म्हणून ५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणने ३४ विजय आणि २१ पराभव पत्करले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० कर्णधार म्हणून त्याने ५२ पैकी ४२ सामने जिंकले आहेत. अफगाणने २००९ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले आणि २०१० मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले.