इंग्लंडने जगाला क्रिकेटचे धडे दिले, हा खेळ सभ्य गृहस्थांचा आहे, हेदेखील त्यांनीच जनमानसात बिंबवले. क्रिकेटमध्ये फलंदाजीला कसे उभे राहावे आणि कसे फटके मारावेत, याचे धडेही दिले. अशा या इंग्लंडकडून तो क्रिकेट खेळणारा, पण त्याची फलंदाजी मात्र इंग्लंडच्या परंपरेला छेद देणारी. कारण त्याचा जन्मच मुळात दक्षिण आफ्रिकेमधील. तिथे त्याने क्रिकेटचा श्रीगणेशा केला खरा, पण नेल्सन मंडेला यांच्या भूमीमध्येच त्याला जातीयवादाचा वाईट अनुभव आला. आपल्या मुलामधील क्रिकेटमधील गुणवत्ता वाया जाऊ नये असे केव्हिनच्या आईला वाटत होते आणि त्यामुळेच तिने त्याला इंग्लंडमध्ये आणले. आताच्या घडीला ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या अॅशेस कसोटी सामन्याच्या निमित्ताने तो इंग्लंडकडून शंभरावा कसोटी सामना खेळत आहे.
इंग्लंडला फलंदाजांची परंपरा आहे, त्यांची टीकाही त्याच धर्तीवर होत असते. पण तरीही तो इंग्लंडच्या संघात जाऊन बसला आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १,००० आणि २,००० धावा त्याने केल्या, तर कसोटी क्रिकेटमध्येही पहिल्या २५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा खेळाडू होता. इंग्लंडकडून फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमाकांवर पोहोचणारा तो पहिला खेळाडू ठरला. क्रिकेटला ‘स्विच हिट’ या फटक्याची देणगीही त्यानेच दिली. एवढी देदीप्यमान कामगिरी पाहून साऱ्यांनाच त्याच्याबद्दल अतीव आदर वाटायला हवा होता, पण तसे होताना दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने तो मैदानात गाजला तसाच मैदानाबाहेरील वादविवादांमध्येही.
२००९ साली त्याला इंग्लंडचे कर्णधारपद देण्यात आले. या काळात प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्याशी त्याचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्याची इंग्लंडने हकालपट्टी केली. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दारू पिऊन धिंगाणाही त्याने घातला होता. दक्षिण आफ्रिका जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आली, तेव्हा त्याने चौथ्या कसोटी सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मोबाइलद्वारे संदेश पाठवला आणि पुन्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. कर्णधार अॅन्ड्रय़ू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी त्याला संघात घेऊ नये असा आग्रह धरला. ३१ मे २०१२ साली त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णयही घेतला, पण कर्णधार अॅलिस्टर कुकने पीटरसनचा निर्णय बदलण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे म्हटले जाते. कारण त्याला पीटरसनची गुणवत्ता, अनुभव, जिगर याची कल्पना होती. त्यामुळेच त्याने पीटरसनला भारताच्या दौऱ्यासाठी संघात घेतले आणि पीटरसननेही वानखेडेवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली. त्यानंतर मायदेशात अॅशेस जिंकल्यावर मैदानात बीअर पिऊन खेळपट्टीवर मूत्रविर्सजन करणाऱ्यांमध्ये पीटरसनही होताच.
सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याला फक्त १८ धावाच करता आल्या. फलंदाजी करताना जसा त्याला कसलाही फरक पडत नाही, तसेच या टीकेचेही आहे. एकटय़ाच्या जोरावर सामना फिरवणाऱ्याची किमया साधणाऱ्या या पराक्रमी खेळाडूला खरे तर अवलिया म्हणायला हवा, पण त्याच्या कृत्यांमुळे त्याला लोक ‘अवली’ म्हणतात.
‘अवलि’या!
इंग्लंडने जगाला क्रिकेटचे धडे दिले, हा खेळ सभ्य गृहस्थांचा आहे, हेदेखील त्यांनीच जनमानसात बिंबवले. क्रिकेटमध्ये फलंदाजीला कसे उभे राहावे आणि कसे फटके मारावेत, याचे धडेही दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2013 14 kevin pietersen excited by special 100th test