पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. हा सामना जर इंग्लंडने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकता येईल, त्यामुळेच या विजयासाठी ते जिवाचे रान करतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आपली शान टिकविण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल, कारण हा सामना जिंकल्यास त्यांना मालिका जिंकण्याची आशा राखता येईल किंवा बरोबरीत सोडवता येईल. पण हा सामना गमावल्यास त्यांच्या हातून मालिका निसटेल व सामना अनिर्णित राहिल्यास त्यांचे मालिका जिंकण्याचे स्वप्न विरून जाईल. त्यामुळे ओल्ड ट्रॅफर्डच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवरील सामना मालिकेची दिशा बदलणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल. दोन्ही सामन्यांमध्ये  ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडचा संघ नक्कीच वरचढ ठरला आहे.