‘कठीण समय येता बेल कामास येतो’ हे सुभाषित सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये प्रचलित झाले असावे. कारण दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यातही बेलने शतक झळकावत संघाला सुखरूपपणे बाहेर काढण्याचा पराक्रम केला आहे. लॉर्ड्सवर सामना सुरू झाल्यावर इंग्लंडला पहिले तीन हादरे अवघ्या २८ धावांत बसले होते. पण बेलने झुंजार शतकाच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या दिवसअखेर ७ बाद २८९ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि काही सहाव्या षटकांतच त्यांची ३ बाद २८ अशी अवस्था झाली. त्यानंतर इयान बेलने जोनाथन ट्रॉटच्या (५८) साथीने चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची आणि जॉनी बेअरस्टोव्हबरोबर (६७) पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. ‘बॅक पॉइंट’ला दोन धावा घेत बेलने कारकिर्दीतील १९वे आणि अ‍ॅशेसमधील सलग तिसरे शतक झळकावले. शतक झळकावल्यावर तो फार टिकू शकला नाही. स्टिव्हन स्मिथने त्याला बाद केले. बेलने १६ चौकारांच्या साहाय्याने १०९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. स्मिथने बेलनंतर बेअरस्टोव्ह आणि मॅट प्रायर (६) यांनाही बाद करत सामन्यात रंगत आणली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ८९ षटकांत ७  बाद २८९ (इयान बेल १०९, जॉनी बेअरस्टोव्ह ६७, जोनाथन ट्रॉट ५८; स्टिव्हन स्मिथ ३/१८) वि. ऑस्ट्रेलिया.