पुनरागमन झोकात साजरे करणाऱ्या वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने पहिल्या अॅशेस कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावरही आपला ठसा उमटवला आहे. बलाढय़ इंग्लंडने पहिल्या डावात फक्त १३६ धावांत शरणागती पत्करल्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटीवरील आपली पकड घट्ट केली आहे.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीने हाराकिरी पत्करल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. परंतु अॅशेस विजेतेपद नावावर असणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाची फळीही अतिशय दयनीय पद्धतीने कोलमडली. त्यांचे सहा फलंदाज फक्त नऊ धावांच्या फरकाने तंबूत परतले.
ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६५ धावा करीत आपली एकंदर आघाडी ही २२४ धावांपर्यंत वाढवली आहे. खेळ थांबला तेव्हा डेव्हिड वॉर्नर ४५ आणि ख्रिस रॉजर्स १५ धावांवर खेळते होते.
डावखुरा वेगवान गोलंदाज जॉन्सन इंग्लंडसाठी धोकादायक ठरला. त्याने १३ षटकांत ४६ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. त्याने जॉनाथन ट्रॉट, मायकेल कारबेरी, जो रूट आणि ग्रॅमी स्वान या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लिश भूमीवर ०-३ अशा फरकाने अॅशेस मालिका गमावली होती. परंतु मायदेशात मात्र कांगारूंचा संघ आत्मविश्वासाने खेळत असल्याचा प्रत्यय येत आहे. रयान हॅरिसने तीन बळी घेत जॉन्सनला छान साथ दिली. याशिवाय फिरकी गोलंदाज नॅथन लिऑनने दोन बळी घेतले, तर स्टीव्हन स्मिथने तीन झेल टिपले.
कसोटी कारकिर्दीतील शंभराव्या सामन्यात खेळणाऱ्या केव्हिन पीटरसनला पीटर सिडलने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल सोडून ८ धावांवर जीवदान दिले. परंतु पीटरसन मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आणि हॅरिसच्या चेंडूवर मिड विकेटला जॉर्ज बेलीकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ४२ चेंडूंत फक्त १८ धावा केल्या.
सकाळच्या सत्रात अनुभवी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. वैयक्तिक ९४ धावांवर तो धावचीत होऊन माघारी परतला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने २४ षटकांत ८१ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९७.१ षटकांत सर्व बाद २९५ (ब्रॅड हॅडिन ९४, मिचेल जॉन्सन ६४; स्टुअर्ट ब्रॉड ६/८१, जेम्स अँडरसन २/६७)
इंग्लंड (पहिला डाव) : ५२.४ षटकांत सर्व बाद १३६ (मायकेल कारबेरी ४०, स्टुअर्ट ब्रॉड ३२; रयान हॅरिस ३/२८, मिचेल जॉन्सन ४/६१)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : २२ षटकांत बिनबाद ६५ (ख्रिस रॉजर्स खेळत आहे १५, डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ४५)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा