दुसरी कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी इंग्लंडच्या अखेरच्या चार फलंदाजांना सोमवारचा पूर्ण दिवस खेळून काढायला हवा. अन्यथा ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत २-० अशी मुसंडी मारणार, हे निश्चित आहे. चौथ्या दिवसअखेर ६ बाद २४७ धावांवर खेळणाऱ्या इंग्लंडचा एकही विशेष फलंदाज बाकी नसून अशक्यप्राय विजयाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना २८४ धावांची आवश्यकता आहे.
कर्णधार अॅलिस्टर कुक, मायकेल कार्बेरी आणि इयान बेल यांनी चुकीचे फटके खेळून तंबूची वाट धरली. परंतु जो रूट (८७) आणि केव्हिन पीटरसन (५३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा विजय लांबवला. त्यानंतर मॅट प्रायर (खेळत आहे ३१) आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी (खेळत आहे २२) चौथ्या दिवसातच सामना संपणार नाही, अशी आश्वासक फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव घोषित करून इंग्लंडपुढे विजयासाठी ५३१ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लिश कप्तान कुक मिचेल जॉन्सनच्या पहिल्याच षटकात लाँग लेगला रयान हॅरिसकडे झेल देऊन फक्त एक धाव काढून माघारी परतला. मग पीटर सिडलच्या गोलंदाजीवर कार्बेरी (१४) डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर नॅथन लिऑनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर रूट आणि पीटरसन यांनी सध्या चालू असलेल्या अॅशेस मालिकेतील सर्वोत्तम भागीदारी साकारत इंग्लंडचा डाव सावरला. सिडलने २१ धावांत २ बळी घेतले.

Story img Loader