मँचेस्टर येथे सुरू असलेल्या Ashes 2019 मधील चौथ्या सामन्यात कसोटीत स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबूशेन यांनी अर्धशतके झळकावून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी साकारलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ बाद १७० अशी मजल मारली. पण पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यात स्टीव्ह स्मिथने अर्धशतक झळकावत साऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले. त्याच्या खेळीएवढीच त्याच्या अजून एका गोष्टीची चर्चा झाली. स्मिथने फलंदाजी करताना गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्विंगसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर त्याने योग्य वेळी फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले. प्रत्येक चेंडू त्याने योग्य पद्धतीने टोलवला. विशेष म्हणजे सामना सुरू असताना वाऱ्याच्या प्रवाहामुळे बीच बॉल मैदानात आला होता. त्यावेळी काही क्षणांसाठी खेळ थांबला, पण स्मिथ तो बॉलदेखील बॅटने सीमारेषेच्या दिशेने टोलवला. त्याच्या या कृत्यानंतर काही काळ मैदानावर हशा पिकला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यानंतर डेव्हिड वॉर्नर (०) आणि मार्कस हॅरिस (१३) यांना स्टुअर्ड ब्रॉडने तंबूची वाट दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलियाची २ बाद २८ अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु लॅबूशेन (६७) आणि स्मिथ (खेळत आहे ६०) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्रेग एव्हर्टनने लॅबूशेनला बाद करून ही जोडी फोडली. पण स्मिथ मात्र मैदानावर पाय रोवून उभा आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४४ षटकांत ३ बाद १७० (मार्नस लॅबूशेन ६७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६०; स्टुअर्ट ब्रॉड २/३५)