दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरच्या मैदानात, स्मिथने दमदार शतक झळकावलं आहे. दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात २४५ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं कसोटी क्रिकेटमधलं हे २६ वं शतक ठरलं आहे. या शतकासह स्टिव्ह स्मिथने विराट कोहलीला पुन्हा एकदा मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २५ शतकं जमा आहेत. काही दिवसांपूर्वी स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत विराटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं होतं. यानंतर स्मिथने विराटला हा दुसरा धक्का दिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला फॉर्मात असलेल्या फलंदाजांच्या यादीतही सध्या स्मिथच आघाडीवर आहे.

१) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया – २६ शतकं

२) विराट कोहली – भारत – २५ शतकं

३) केन विल्यमसन – न्यूझीलंड – २० शतकं

४) जो रुट – इंग्लंड – १६ शतकं

बॉल टॅम्परिंग प्रकरणात शिक्षा भोगून पुनरागमन केल्यानंतर स्टिव्ह स्मिथ चांगल्याच फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्ध स्मिथचं हे ११ वं शतक ठरलं आहे. इंग्लंडविरुद्ध गेल्या ८ डावांमध्ये स्मिथने पाचवेळा शतक झळकावलं आहे, यावरुन स्मिथ सध्या चांगल्याच फॉर्मात असल्याचं दिसून येतंय.