क्रिकेटमध्ये नवनवीन घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा घटना सर्वांनाच तोंडात बोटे घालायला लावतात. असाच काहीसा एक प्रकार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत सर्वांना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅमेरून ग्रीन बेन स्टोक्सला गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. ग्रीनने स्टोक्सला चेंडू टाकला आणि तो ऑफस्टम्पची कड घेऊन मागे गेला. पण बेल्स न पडल्यामुळे स्टोक्स बाद झाला नाही.
ऑफस्टम्पला चेंडू लागल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू आश्चर्यचकित झाले. बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा यावर विश्वासही बसला नाही, त्यांनी स्टम्पची शहानिशाही केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या सत्रात इंग्लंडने चार विकेट गमावल्या. स्कॉट बोलंडने सलग दोन विकेट घेत पाहुण्या संघाला दोन धक्के दिले.
उपाहारानंतर बेन स्टोक्स आणि जॉन बेअरस्टो यांनी दुसऱ्या सत्रात आपल्या संघाची धुरा सांभाळली. स्टोक्स १६ धावांवर खेळत असताना त्याला हे जीवदान मिळाले. अंपायरने त्याला पायचीत पकडले, पण स्टोक्सने यावर रिव्ह्यू घेतला. कॅमेरून ग्रीनचा चेंडू फलंदाजाच्या ऑफ-स्टंपला लागल्याचे व्हिडिओ रिप्लेमध्ये दिसून आले. अखेरीस स्टोक्स ६६ धावा करून नाथन लायनचा बळी ठरला.
हेही वाचा – सावधान..! आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आला नवा नियम; ‘अशी’ चूक झाली तर बसणार मोठा फटका!
महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर या घटनेची खिल्ली उडवली आहे. सचिन तेंडुलकरने लिहिले, “बॉल विकेटला आदळल्यानंतर आणि बेल्स खाली न पडल्यानंतर ‘हिटिंग द स्टम्प’ हा नवा नियम आणावा का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते?” या पोस्टमध्ये सचिनने शेन वॉर्नलाही टॅग केले.”
फॉक्स स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणारा शेन वॉर्नही हे पाहून थक्क झाला आणि म्हणाला, “मी असे कधीच पाहिले नव्हते. अंपायरने आऊट दिला. खरोखर विचित्र गोष्ट. पॉल रायफल हा स्वतः गोलंदाज होता आणि त्याने स्वतः चेंडू स्टम्पला लागल्याचे पाहिले आणि तरीही तो आऊट दिला. मी पाहिलेल्या सर्वात विचित्र गोष्टींपैकी ही एक आहे. चेंडू स्टम्पला लागला आणि बेल्स हलले नाहीत. माफ करा, मला आतापर्यंत धक्का बसला आहे. मी जे पाहिले त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.”