ENG vs AUS, Ashes 2023: ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्यांनी पकडलेले झेल यावरून ते नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होतात. त्यांनी पकडलेले झेल हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात का सापडतात? हा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे. वादग्रस्त झेल हे प्रकरण ऑसी खेळाडूंची पाठ काही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. अॅशेस मालिकेअंतर्गत लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी असेच दृश्य समोर आले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात जो रूटची विकेट वादाचा विषय ठरली. त्याला स्टीव्ह स्मिथने अंपायरवर दबाव टाकला असे स्पष्टपणे त्या कॅच घेतलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते.
अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरशीची लढत सुरू आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ जरी बरोबरीवर असले तरी दिवस स्टीव्ह स्मिथच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधील ३२वे शतक झळकावले आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान दोन झेल घेतले. यातील एक झेल मात्र वादाचे कारण ठरला, त्याच्या या झेलने वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपमधील शुबमन गिलच्या विकेटची आठवण करून दिली. ऑस्ट्रेलियाने चीटिंग केले का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चेंडू जमिनीला लागला होता!
ही घटना इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४६व्या षटकात घडली. १८ चेंडूत १० धावांवर खेळत असलेल्या रुटला अवघ्या एका धावेवर कांगारूंनी जीवदान दिले पण याच षटकात मिचेल स्टार्कच्या शॉर्ट बॉलच्या चेंडूवर रूट चुकीचा फटका खेळला. या चेंडूवर रूटने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत उडाला. येथे चेंडू येत असल्याचे पाहून स्टीव्ह स्मिथने धावत जाऊन डायव्हिंग करून झेल पकडला. त्याच्या हातातून चेंडू थोडासा निसटला पण शेवटी त्याने तो पकडला.
चेंडू पुन्हा त्याच्या अंगावर थोडासा टप्पा पडून उसळला पण स्मिथने त्याला त्याच्या तळहातातून बाहेर पडू दिले नाही. खरं तर ही काही इंचांची बाब होती आणि शेवटी ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यात त्याच्यामते यशस्वी झाला. जो रूट हा झेल स्मिथने घेतल्यानंतरही मैदानावर अंपायरच्या निर्णयाची वाट पाहत होता, परंतु फिल्ड अंपायरने थर्ड अंपायर मारियास इरास्मस यांच्याकडे हा निर्णय पाठवला, त्यांनी अनेक रिप्ले पाहिल्यानंतर रूटला आऊट दिले. रिप्लेमध्ये असे दिसून आले की स्मिथने चेंडूखाली बोटे येण्यासाठी योग्य वेळी डायव्हिंग केले होते. मात्र, रुटप्रमाणेच चाहतेही या निर्णयावर खूश नाहीत.
लॉर्ड्सवर उपस्थित प्रेक्षकांनी या निर्णयावर उघडपणे टीका केली. यानंतर स्मिथ आणि संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघावरही सोशल मीडियावर चीटिंग केल्याचा आरोप करण्यात आला. त्याच वेळी, भारतीय चाहत्यांनी स्मिथच्या झेलची तुलना जूनच्या सुरुवातीला लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कॅमेरून ग्रीनने शुबमन गिलच्या झेलशी केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी स्कॉट बोलंडच्या चेंडूवर शुबमन गिल पुढे गेला पण चेंडू गिलच्या बॅटला लागला आणि स्लिपच्या दिशेने गेला. तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरून ग्रीनने डावीकडे डायव्हिंग टाकत एका हाताने झेल टिपला. थर्ड अंपायरने गिलला बाद ठरवले पण टीव्ही रिप्लेमध्ये ग्रीनचे बोट आणि चेंडू जमिनीवर आदळताना दिसल्याने वाद निर्माण झाला. रिप्लेच्या काही अँगलमध्ये ग्रीनच्या बोटांमधून बॉल जमिनीला स्पर्श करत असल्यासारखे वाटत होते. चाहते आधीच संतापले होते आणि हा वाद आणखी वाढला जेव्हा खुद्द शुबमन गिलने ग्रीनच्या झेलचे छायाचित्र ट्वीट केले. ज्यासाठी त्याला दंडही भरावा लागला.