MCC on Usman Khawaja: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी कर्णधार बेन स्टोक्सच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही यजमानांना ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला. कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले पण तो पार करण्यात अपयशी ठरला.
या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमच्या लॉंग रुममध्ये एक अशोभनीय घटना पाहायला मिळाली. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर दोन्ही संघांमधील चुरशीच्या लढतीत दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर चाहत्यांशी भिडले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून या गैरवर्तनासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला जबाबदार धरले आहे. काहींनी खेळाडूंना हातही लावला. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते ऑस्ट्रेलियन खेळाडू त्या परिसरातून जात होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.
अंपायर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला
सुरुवातीला उस्मान ख्वाजा प्रेक्षकांशी बोलताना दिसला. त्यावेळी चाहत्यांनी संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. रांगेत मागच्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरने प्रेक्षक आणि ख्वाजा यांच्यातील जोरदार वादावादीचे संपूर्ण वर्णन केले. अशा स्थितीत वॉर्नर देखील तेथील प्रेक्षकांशी वाद घालताना दिसला. यावेळी अंपायर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण कुठेतरी संपले आहे.
एमसीसी सदस्य ऑस्ट्रेलियन संघाला शिवीगाळ करत होते
या वादाचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये अधिक लोक ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंना शिवीगाळ करत त्यांना चीटर-चीटर म्हणत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जागतिक क्रिकेटमध्ये लाँग रूमचे विशेष स्थान आहे. पॅव्हेलियनमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंनी येथून जाणे ही सन्मानाची बाब आहे. मात्र, घडलेली घटना ही निंदनीय स्वरुपाची असून आम्ही याचा तीव्र स्वरुपात निषेध करतो.”
एमसीसीने माफी मागितली
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एमसीसीने अधिकृत निवेदन जारी करून या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागितली. यासंदर्भात एमसीसीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “रविवारी सकाळच्या सत्रानंतर घडलेल्या प्रकार हा दुर्दैवी होता. त्यावेळी सर्व इंग्लंडच्या चाहत्यांच्या भावना उफाळून आल्या होत्या. दुर्दैवाने काही सदस्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अपशब्द वापरले. याबद्दल आम्ही ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागतो. त्याचबरोबर जे सदस्य सन्मानाची काळजी घेणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करून शिस्तभंगाची नोटीस दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला विनाकारण मैदानाबाहेर करण्याची गरज नव्हती. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा असे घडले नाही, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही.” लॉर्ड्स कसोटी ४३ धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने २०२३ अॅशेसमध्ये २-० अशी आघाडी घेतली. हेडिंग्ले येथे ६ जुलैपासून मालिकेतील तिसर्या कसोटीत दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.