अॅशेस कसोटी मालिकेतील सिडनी येथे रंगलेला चौथा सामना रोमांचक पद्धतीने ड्रॉ झाला. पाचव्या दिवशी इंग्लंडने आपल्या शेवटच्या गड्याला वाचवत हा सामना ऑस्ट्रेलियाकडून हिरावला. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या सत्रात अंपायरने ऑस्ट्रेलियन कर्णधाराला स्पिनरकडून उरलेली षटके टाकण्यास सांगितले. त्यानंतर पॅट कमिन्सने चेंडू स्टीव्ह स्मिथकडे सोपवला. स्मिथने तिसर्याच षटकात जॅक लीचची विकेट घेत इंग्लंडच्या कॅम्पमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केले. जॅक लीच बाद होताच स्मिथने आनंदात उडी मारली. त्याचा संघसहकारी मार्नस लाबुशेनने त्याला उचलून घेत आनंद साजरा केला. स्मिथला २०१६ नंतर पहिल्यांदाच विकेट मिळाली.
लीचला १००व्या षटकात स्मिथने बाद केले. स्मिथला सहा वर्षांनंतर कसोटीत गोलंदाजी करताना यश मिळाले. स्मिथच्या षटकात लीचला पहिले पाच चेंडू खेळता आले, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्मिथने ऑफ-स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू टाकला आणि लीचला डेव्हिड वॉर्नरला पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद केले. स्मिथने विकेट घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि स्टेडियममधील प्रेक्षक खूश झाले. खूप दडपण असूनही, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी शेवटच्या दोन षटकांमध्ये यशस्वीपणे झुंज दिली.
हेही वाचा – आता क्रिकेटमधून निवृत्ती घेणंही बनलं कठीण..! ‘या’ कडक नियमांमुळे उडालीय खळबळ
जॅक लीचच्या आधी कसोटीत स्मिथने नोव्हेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नन फिलँडरला बाद केले. स्मिथच्या नावावर आता १८ कसोटी बळी आहेत. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर एकही विकेट न गमावता ३० धावा केल्या होत्या. मालिकेत ४-० अशी आघाडी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स घ्याव्या लागणार होत्या. मात्र सर्व प्रयत्न करूनही ऑस्ट्रेलियन संघ केवळ नऊ विकेट घेऊ शकला आणि विजयापासून एक विकेट दूर राहिला.