ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सध्याच्या अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या सलग दुसर्‍या पराभवानंतर जो रुटला फटकारले आहे. रूटने आपल्याच संघातील गोलंदाजांवर टीका केली, त्यानंतर पाँटिंगने रूटवर तोंडसुख घेतले. रणनीती प्रत्यक्षात आणणे, ती सुनिश्चित करणे ही कर्णधार म्हणून आपली जबाबदारी असल्याचे मत पाँटिंगने दिले. ऑस्ट्रेलियाकडून दुसरी कसोटी २७५ धावांनी गमावल्यानंतर इंग्लंड मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. पहिल्या डावात योग्य टप्प्याची गोलंदाजी करण्यात अपयशी ठरल्याचे मत रूटने सामन्यानंतर दिले होते.

रिकी पाँटिंगने cricket.com.auला सांगितले की, “हे विधान आश्चर्यकारक आहे. गोलंदाजांना बदल करायला सांगणे हे कोणाचे काम आहे? मग तू कर्णधार का आहेस? तुम्ही तुमच्या गोलंदाजांना कोणत्या लांबीवर गोलंदाजी करायची हे प्रेरित करू शकत नसल्यास, तुम्ही मैदानावर काय करत आहात?”

हेही वाचा – ‘‘भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर…”, रवीचंद्रन अश्विनचा गौप्यस्फोट; घेणार होता निवृत्ती!

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या पाँटिंगने सांगितले, “जो रूट त्याला हवे ते म्हणू शकतो, परंतु जर तुम्ही कर्णधार असाल तर तुम्हाला हे समजले पाहिजे की तुमचे गोलंदाज तुम्हाला हवे तसे गोलंदाजी करत नाहीत. आणि जर ते तुमचे ऐकत नसतील, तर तुम्ही त्यांना बाहेर बसवू शकतात. दुसर्‍याला संधी द्या. तुम्ही मैदानावर त्यांच्याशी उत्तम संवाद साधू शकता आणि तुम्हाला काय हवे आहे ते सांगू शकता. कर्णधारपद असेच असते.”

दुसरी कसोटी गमावल्यानंतर रूट म्हणाला, “चेंडू योग्य दिशेने टाकणे आणि विकेट घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या मूलभूत गोष्टी बरोबर ठेवू शकत नाही. आम्हाला आमची कामगिरी सुधारावी लागेल. मला खात्री आहे, की आम्ही येथे कसोटी जिंकू शकू आणि आम्ही त्या उद्देशाने खेळू.”

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी अ‍ॅशेस कसोटी रविवारी मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.

Story img Loader