तिसऱ्या सामन्यात इंग्लंडवर मात करीत मालिकेत विजयी आघाडी
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ विजयासाठी आसूसलेला होता. पण दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाले. तीन तासांचा खोळंबा झाला. ऑस्ट्रेलियाचा विजय पावसामुळे पाण्यात तर जाणार नाही ना, या चर्चाना ऊत आला. पण ऑस्ट्रेलियाची जिंकण्याची ईर्षां एवढी प्रबळ होती की त्यांनी इंग्लंडचा दुसरा डाव चहापानापूर्वीच संपुष्टात आणत अॅशेसचा गड सर केला. अॅशेस मालिकेच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर एक डाव आणि ४१ धावांनी मात करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावातील शतकवीर डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टोव यांच्यावर इंग्लंडची मदार होती. पण दिवसाच्या दुसऱ्याचा षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने बेअरस्टोवला त्रिफळाचीत केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे दार किलकिले झाले. पण त्यांच्या विजयाच्या मार्गात मलान उभा होता. मलानने मोईन अलीला (११) साथीला घेत सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. त्या वेळी इंग्लंडला आपण सामना वाचवू शकतो, असे वाटू लागले होते. पण फिरकीपटू नॅथन लिऑनने मोईनला पायचीत पकडले आणि ही जोडी फोडली. मात्र मलानला कसे बाद करायचे, हा ऑस्ट्रेलियापुढे यक्षप्रश्न उभा ठाकला होता. पण हेझलवूडने पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. हेझलवूडने मलानला यष्टीरक्षक टीम पेनकरवी झेलबाद करीत तंबूत धाडले आणि ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. मलानने १३५ चेंडूंचा सामना करताना आठ चौकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. मलान बाद झाल्यावर २२ धावांमध्ये इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा विजयोत्सवाला सुरुवात झाली. हेझलवूडने पाच बळी मिळवीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अॅशेस कसोटी मालिकेतील पाच बळी मिळवण्याची हेझलवूडची ही पहिली वेळ होती.
या मालिकेत पहिले तिन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने वर्चस्व कायम राखले आहे. आता या मालिकेतील ते ५-० असा विजय मिळवतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. यापूर्वी २००६-०७ आणि २०१३-१४ या वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व राखले होते.
खेळपट्टीचा वाद
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाची सुरुवात झाली ती वरूण राजाच्या आगमनाने. या पावसामुळे खेळपट्टीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. खेळपट्टी जोपर्यंत चौथ्या दिवसअखेर होती तशी होत नाही, तोपर्यंत खेळ सुरु करणार नसल्याची भूमिका मैदानावरील पंचांनी घेतली. त्यामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांना खेळपट्टी पूर्वीसारखी करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. जर ‘वाका’ची खेळपट्टी पावसानंतर काही वेळात पूर्ववत होऊ शकत नसेल, तर या मैदानात सामना खेळवावा की नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. पाऊस आणि त्यानंतर खेळपट्टी पूर्ववत होईपर्यंत तीन तासांचा खेळ वाया गेला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ४०३.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) ९ बाद ६६२ (डाव घोषित)
इंग्लंड (दुसरा डाव) : ७२.५ षटकांत सर्व बाद २१८ (जेम्स व्हिन्स ५५, डेव्हिड मलान ५३; जोश हेझलवूड ५/४८); सामनावीर : स्टीव्हन स्मिथ. निकाल : ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ४१ धावांनी विजयी.
अॅशेस मालिकेपूर्वी आमचे काही खेळाडू भारतामध्ये एकदिवसीय सामने खेळत होते. पण आम्हाला साऱ्यांनाच एकदिवसीय मालिकेनंतर अॅशेस मालिकेत कसे खेळायचे आहे, हे नेमके माहिती होते. आम्ही अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी आसूसलेलो होतो. प्रत्येक खेळाडूचे या विजयात योगदान आहे. निवड समिती या मालिकेसाठी योग्य पावले उचचली, त्यामुळे त्यांचे आभार.
– स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार.
मालिकेतील तीन सामने गमावल्याने मी निराश आहे. पण अजूनही दोन सामने शिल्लक आहेत आणि या सामन्यांमध्ये यापूर्वी झालेल्या टीका टाळण्याचा आमचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी आम्ही चांगली तयारी केली होती, पण रणनीतीची योग्य अंमलबजावणी आम्हाला करता आली नाही. यापुढील सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.
– जो रूट, इंग्लंडचा कर्णधार