Kevin Pietersen On England Team: अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर खेळली जात आहे. पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. नाणेफेक गमावल्यानंतर ग्रीन टॉप विकेटवर फलंदाजीसाठी आलेल्या कांगारूंनी इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यांनी इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत पहिल्या दिवशी ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या या कामगिरीवर माजी कर्णधार केविन पीटरसन संतप्त दिसला. त्याने आपल्या संघावर सडकून टीका केली आणि इंग्लंडची कामगिरी ‘लज्जास्पद’ असल्याचे म्हटले आहे.
लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामागील कारण खेळपट्टीवर हिरवे गवत होते आणि हवामानही ढगाळ होते. असे असूनही इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना या स्थितीचा फायदा उठवता आला नाही आणि उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने केवळ एक विकेट गमावली होती. पहिल्या कसोटीतील शतकवीर उस्मान ख्वाजा अवघ्या १७ धावा करून बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७३/१ होती. दुसरे सत्रही ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिले. जोश टँगची एक विकेट वगळता इंग्लिश गोलंदाज झुंजताना दिसले. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या घातक जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. यानंतर लाबुशेन बाद होताच स्मिथने ट्रॅव्हिस हेडला हाताशी धरत आणखी एक शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडचा खेळ खल्लास केला.
इंग्लंडची कामगिरी ही खूप लाजिरवाणी- पीटरसन
चहापानाच्या सत्रापर्यंत इंग्लंडने ५० षटकांत २ विकेट्स गमावून १९० धावा केल्या होत्या. दरम्यान, केविन पीटरसनने स्काय स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, “इंग्लंडच्या बाबतीत बोलायचे तर, माझ्या दृष्टिकोनातून लक्ष वेधून घेणारे असे काहीही घडले नाही. गोलंदाजी खरोखरच लाजिरवाणी होती. त्यावेळी हवामान आणि खेळपट्टी तुमच्या गोलंदाजांना अनुकूल होती. ढगाळ हवामान आणि हिरवि खेळपट्टी असे असतानाही अजून तुम्हाला काय हवे? तुमच्याकडे ७८-७९ mph वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज होते. मला वाटते की प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी खेळाडूंना फटकारले पाहिजे आणि त्यांना सांगितले पाहिजे की एवढं पुरेसं नाही.”
‘इंग्लंडच्या गोलंदाजांना गोलंदाजीत धार दिसली नाही‘– माजी खेळाडू केविन पीटरसन
इंग्लंडच्या देहबोलीबाबतही पीटरसनने इंग्लिश संघाला घरचा आहेर दिला आहे. त्याने गोलंदाजांवर टीका करताना पुढे म्हटले की, “इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजीसाठी अधिक उत्सुक असल्याचे दिसत होते. हा अप्रतिम संघ आहे हे दाखवण्याचा इंग्लंडने प्रयत्न केला पाहिजे. मालिकेत आम्ही चांगले वातावरण तयार करत आहोत, पण ही अॅशेस वाटत नाही.”
ही काय मस्करी सुरु आहे का?- केविन पीटरसन
तो म्हणाला की, “ही एक वेगळी गोष्ट आहे की ऑसी जगाला सांगण्याचा प्रयत्न करते आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहोत. मात्र, आम्ही देखील काही कमी नाही पण हे सांगण्यासाठी तुम्ही आधी तसे वातावरण तयार करा. मी ही अॅशेस खेळलो आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० कसोटी सामने खेळलो आहे.” पीटरसन पुढे इंग्लंडवर भडकला की, “ही काय मस्करी सुरु आहे का? इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमही ड्रेसिंग रुममध्ये संघाला सांगत आहेत की तुम्ही अजिबात चांगला खेळ केला नाही आणि इथे अशी गोलंदाजी करू शकत नाही.”