Ashes2023, ENG vs AUS: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना वादांसाठी कायम लक्षात राहील. या सामन्यात दोन हंगामात तिसरा वाद चव्हाट्यावर आला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चौथ्या दिवशी मिल्च स्टार्कचा झेल अवैध घोषित करण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानावर आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ घातला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात जॉनी बेअरस्टो धावण्याच्या प्रयत्नात नसताना अ‍ॅलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले. चेंडू सोडल्यानंतर तो आपल्या कर्णधाराशी बोलणार होता. या प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन संघाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले आणि पहिले सत्र संपल्यानंतर उस्मान ख्वाजाने असे काही केले की आता तोही वादात सापडला आहे.

सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिले सत्र संपल्यानंतर सर्व खेळाडू परतत होते. त्या दरम्यान, ख्वाजाची लॉंग रूममध्ये एमसीसी (मेरिलिबोन क्रिकेट क्लब) सदस्यांशी झटापट झाली. दोघांमध्ये वादावादी झाली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांना वेगळे केले. मेरिलिबोन क्रिकेट क्लब स्वतः खेळासाठी नियम बनवतो. जेव्हा स्टार्कचा झेल नाकारण्यात आला तेव्हा एमसीसीने ट्वीट केले की त्याचा झेल का नाकारला गेला?

मिचेल स्टार्कच्या झेलवरून वाद

या सामन्यात चौथ्या दिवशी मिचेल स्टार्कच्या झेलवरून वाद झाला. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बेन डकेटने अप्पर कट खेळला आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेने हवेत गेला. स्टार्कने झेल पकडला आणि ऑस्ट्रेलियन संघाने विकेटचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याला विकेट मिळाली नाही. फिल्ड अंपायर यांनी झेलचा निर्णय घेण्यासाठी थर्ड अंपायरलाकडे हे प्रकरण सोपवले आणि स्टार्कने डायव्हिंग केल्यावर चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. यानंतर फलंदाज डकेटला नाबाद दिले. यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सनेही अंपायरशी वाद घातला.

ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी या झेल प्रकरणावर सोशल मीडियामध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली. शेवटी MCCने ट्वीट केले की, “नियम ३३.३ स्पष्टपणे सांगतो की जेव्हा क्षेत्ररक्षकाचे ‘बॉल आणि त्याच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असते’ तेव्हा एक झेल पूर्ण होतो. त्यापूर्वी चेंडू जमिनीला स्पर्श करू शकत नाही. या विशिष्ट घटनेत, मिचेल स्टार्क, अजूनही पुढे सरकत आहे आणि चेंडू जमिनीवर घासत होता. त्यामुळे हा तो नियंत्रणात नव्हता.” पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर उस्मान ख्वाजा याच एमसीसी सदस्यांशी भिडला. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. लॉर्डस क्रिकेट ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये मध्यस्थी केली.

बेअरस्टोच्या रनआउट बाबत झाला गोंधळ

सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि कर्णधार बेन स्टोक्सने बेन डकेटसोबत चांगली भागीदारी करत संघाला सामन्यात पुन्हा आणले. डकेट बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि स्टोक्स यांनी भागीदारी पुन्हा रचण्यास सुरूवात केली, पण बेअरस्टो दुर्दैवाने धावबाद झाला. बेअरस्टोने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ५२व्या षटकातील शेवटचा चेंडू सोडला आणि स्टोक्सशी बोलण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला. हे पाहून यष्टिरक्षक कॅरीने झेललेला चेंडू स्टंपवर थ्रो केला. नियमानुसार, चेंडू डेड नव्हता आणि ऑस्ट्रेलियाच्या अपीलवर, अंपायरनी बेअरस्टोला बाद घोषित केले.

हेही वाचा: Eng vs Aus Ashes: बेन स्टोक्सची झुंज अपयशी! कांगारूंनी इंग्लंडला पाजले पाणी, ४३ धावांनी मात करत जिंकली दुसरी कसोटी

नियमानुसार बेअरस्टो बाद होता, पण तो धावत नव्हता आणि खेळ भावनेनुसार त्याला बाद करणे योग्य नव्हते. बेअरस्टो १० धावा करून बाद झाला आणि लॉर्ड्सच्या मैदानावर प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध चीटर-चीटर असे ओरडण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन संघ सध्या खूप ट्रोल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes video third controversy in lords test usman khawaja got entangled with mcc member security personnel intervened avw