भारताचे माजी फिरकीपटू आशिष कपूर यांची भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी व्यंकटेश प्रसाद यांनी निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद हे आयपीएलच्या अकराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे Conflict of Interest टाळण्यासाठी प्रसाद यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. प्रसाद यांच्याव्यतिरीक्त ग्यानेंद्र पांडे आणि राकेश पारिख हे दोन सदस्य निवड समितीवर काम पाहत आहेत.
सुरुवातीच्या काळात आशिष कपूर व्यंकटेश प्रसाद यांच्या ५ सदस्यीय निवड समितीचे सदस्य होते. मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारसीनुसार ही निवड समिती केवळ ३ सदस्यांची करण्यात आली. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थाला आशिष कपूर यांच्या निवडीबद्दल दुजोरा दिला आहे.
आशिष कपूर यांनी भारताकडून ४ कसोटी आणि १७ वन-डे सामने खेळले आहेत. १९९६ साली झालेल्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध उपांत्य सामन्यात आशिष कपूर भारतीय संघात होते. आयपीएलमध्ये मिळालेली ऑफर हे व्यंकटेश प्रसाद यांच्या राजीनाम्यामागचं खरं कारणं असलं तरीही, १९ वर्षाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने जाहीर केलेल्या बक्षिसांत निवड समिती सदस्यांना डावलल्याने प्रसाद नाराज असल्याचं वृत्त होतं.