24 फेब्रुवारीपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघाचा हा अखरेचा वन-डे दौरा असणार आहे. सध्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे 3 प्रमुख गोलंदाज विश्वचषकाच्या संघातले दावेदार मानले जात आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्या हा भारताकडे एक पर्याय आहे. मात्र प्रमुख 3 गोलंदाजांना पर्याय म्हणून चौथा गोलंदाज कोण असेल यावर अजुनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. सध्या युवा खलिल अहमद आणि अनुभवी उमेश यादव यांच्यामध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस आहे. मात्र भारताचा अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने या जागेसाठी उमेश यादवला पसंती दिली आहे.

“उमेश यादवकडे विश्वचषकात गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्याची संघात निवड झाल्यास भारताची गोलंदाजी आणखी बळकट होईल. खलिल अहमद अजुन तुलनेने नवा आहे, त्याच्याकडे अजुनही प्रथमश्रेणी क्रिकेटचा तितकासा अनुभव नाही. त्याची गती मला मंदावलेली दिसते, मात्र प्रत्येक गोलंदाजाला अशा सुरुवातीच्या काळात या समस्येतून जावच लागतं. मात्र तो यामधून लवकरच सावरेल.” आशिष नेहरा टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामन्यांसाठी उमेश यादवची भारतीय संघात निवड झालेली आहे. रणजी क्रिकेटमध्ये उमेश यादवने विदर्भाकडून खेळताना आश्वासक गोलंदाजी केली होती. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीचा उमेश यादव कसा वापर करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader