भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतली पहिला सामना न्यूझीलंड संघाने जिंकला आहे, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तिसरा सामना बुधवारी खेळला जाणार आहे. या मालिकेत युवा खेळाडू शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली कामगिरी केली आहे. अशात आता माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. आशिष नेहराच्या मते, गिल हा भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आशिष नेहरा प्राइम व्हिडिओवर बोलताना म्हणाला, ”शुबमन गिल असा खेळाडू आहे, जो तुम्हाला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून दाखवू शकतो. तो असा खेळाडू आहे जो परिस्थितीनुसार खेळतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतो. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसापूर्वी तो वेगळ्या मानसिकतेने खेळत होता आणि त्यानंतर त्याने आपला दृष्टिकोन बदलला हे आपण पाहिले.”

आशिष नेहरा पुढे म्हणाला, ”गिल हा भारताचा उदयोन्मुख खेळाडू आहे. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड अशी अनेक नावं आहेत. पण गिल या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि यात शंका नाही.”

हेही वाचा – Video:’४००-४५० धावा वर्षात फक्त १-२ सामन्यात होतात’: शुबमन गिलच्या वक्तव्यावर भडकले चाहते; म्हणाले, ‘तुझ्यासारखे..’

भारत आणि न्यूझीलंड संघात दोन वनडे सामने पार पडले आहेत. यातीन पहिल्या सामन्यात शुबमन गिलने अर्धशतक झळकावले होते. त्याने ६५ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४२ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. भारताचे सर्व युवा खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत. विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये देखील सर्व युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉ, नारायण जगदीसन, ऋतुराज गायकवाड हे अनेक खेळाडू आहेत. जे भारतीय निवडकर्त्यांना सांगत आहेत की ते भविष्यात टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू असतील.

शुबमन गिलने आतापर्यंत भारतासाठी १४ एकदिवसीय सामने खेळले असून, ६१.२७ च्या सरासरीने आणि १००.४५ च्या स्ट्राइक रेटने ६७४ धावा केल्या आहेत. त्याने ११ कसोटींमध्ये ३०.४७च्या सरासरीने आणि ५७.३३च्या स्ट्राइक रेटने ५७९ धावा केल्या आहेत. वनडेतही त्याचे शतक आहे. भारतीय संघाकडून गिलला जितक्या अधिक संधी मिळतील, त्याचा तो पूर्णपणे फायदा घेत आहे.