Team India Coach: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पद रिक्त होते त्याजागी पुन्हा राहुल द्रविड याचीच निवड करण्यात आली आहे. विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपला होता, तो पुन्हा पुढे वाढवण्यात आला आहे. हा करार वाढवण्याआधी बीसीसीआयने गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहराला प्रशिक्षकपद स्वीकारण्याची विनंती केली होती. त्याला आयपीएलमध्ये हे काम केले आहे, परंतु त्याने हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच आता बीसीसीआयने पुन्हा राहुल द्रविडला प्रशिक्षकपदी राहण्याची विनंती केली आणि त्याने ती मान्य केली. पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदी राहावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. द्रविड यापूर्वी तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता.
पुढील वर्षी ४ जून रोजी अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. बीसीसीआयला नवीन मुख्य प्रशिक्षकाची लवकरात लवकर नियुक्ती करायची होती. प्रशिक्षक म्हणून पहिल्याच सत्रात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या आशिष नेहराला हा प्रस्ताव देण्यात आला होता. पुढच्या मोसमात संघाने त्याच्या प्रशिक्षणाखाली अंतिम फेरी गाठली होती. गुजरातचे खेळाडू, माजी क्रिकेटपटू, चाहते आदी सर्वांनी आशिष नेहराचे प्रशिक्षक म्हणून खूप कौतुक केले. मात्र, नेहराला सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारायची नाही.
हेही वाचा: Rahul Dravid: बीसीसीआयने द्रविड समोर ठेवला नवा पर्याय; म्हणाले, “टीम इंडियाचे प्रशिक्षक…”
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरचे मत होते की, राहुल द्रविडने पुढील टी-२० विश्वचषकापर्यंत प्रशिक्षकपदावर कायम राहावे. द्रविडने ऑफर स्वीकारल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड या प्रमुख सपोर्ट स्टाफलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्या भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका खेळत आहे, ज्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून संघासोबत आहेत. द्रविडनंतर लक्ष्मणची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ अशा बातम्या येत होत्या मात्र, द्रविडला मुदतवाढ मिळाल्याने ही शक्यता संपली आहे. मात्र, द्रविडच्या गैरहजेरीत तो अनेक वेळा संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करत राहणार असल्याचेही वृत्त आहे.
हेही वाचा: Rahul Dravid: मोठी बातमी! राहुल द्रविडच पुन्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, BCCIने वाढवला करार
रिपोर्ट्सनुसार, द्रविडला त्याच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा होता आणि त्यामुळेच त्याला मुख्य प्रशिक्षकपदी राहायचे नव्हते. तो एनसीए प्रमुख म्हणून काम करण्यास तयार होता कारण, त्याचे घरही बंगळुरूमध्ये आहे आणि एनसीएही तिथेच आहे. मात्र, बीसीसीआयने त्याचा प्रस्ताव नकाराला.