भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात दिल्लीतील घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यातून आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी-२० सामन्यात पहिल्यांदाच न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय संघाने सामना जिंकून नेहराला निरोप दिला. नेहरा आपल्या कारकिर्दीत अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी विराट कोहलीसोबतचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये नेहरा एका मुलाला बक्षीस देताना पाहायला मिळतो. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली होता. ज्या लहान क्रिकेटरचा नेहराने गौरव केला त्याच्या नेतृत्वाखालीच दिल्लीच्या मैदानातून नेहराने क्रिकेटला अलविदा केले. हा एक अनोखा योगायोग असल्याची चांगलीच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.

त्यामुळेच सामन्यानंतर विराट कोहलीला नेहरासोबत व्हायरल झालेल्या फोटोबद्दल विचारण्यात आले. यावर विराट म्हणाला की, हा फोटो २००३ मधील आहे. २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर नेहरा मायदेशी परतला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात तो सहभागी झाल्याचेही विराटने यावेळी सांगितले. त्यावेळी मी अवघ्या १३ वर्षांचा होतो. शालेय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी माझा संघर्ष सुरु होता, असेही विराट म्हणाला.

नेहराचा आंतरराष्ट्रीय प्रवास हा कौतुकास्पद असल्याचे विराटने यावेळी म्हटले. कोणत्याही गोलंदाजासाठी १९ वर्षे मैदानात खेळणे कठीण आहे. मेहनतीच्या जोरावर नेहराने हा प्रवास केला. त्यामुळे आशिष नेहरा गौरवास पात्र असल्याचे कोहली म्हणाला. नेहराने आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे आणि २७ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यात कसोटीत ४४, वनडेत- १५७ आणि टी-२० सामन्यात ३४ बळी नेहराच्या नावे आहेत. अखेरच्या सामन्यात नेहराला एकही बळी मिळवता आला नाही.

Story img Loader